

आटपाडी : शहरातील देशमुख गल्ली परिसरात किरकोळ वादातून दोन गटामध्ये हाणामारी झाली. ही घटना 30 जुलैरोजी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांवर मारहाण आणि दगडफेकीचे आरोप करत आटपाडी पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
देशमुख गल्ली परिसरात रात्री 9.30 वाजता भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर दगडफेक करून त्याला जखमी करण्यात आले आहे. याबाबत चैतन्य धनंजय सुतार (वय 25, रा. सुतार गल्ली, आटपाडी) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी चैतन्य सुतार हा त्याच्या घराबाहेर उभा असताना, त्याचा मित्र अक्षय दीक्षित याला संशयित अनिरुद्ध जयसिंगराव देशमुख (रा. देशमुख गल्ली, आटपाडी) हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसले. चैतन्य याने भांडण सोडवण्यास मध्यस्थी केली असता, देशमुख याने त्याला दमदाटी करत शिवीगाळ केली. त्यानंतर, चैतन्य मित्रासह घराकडे जात असताना अनिरुद्ध देशमुखने त्यांच्या दिशेने दगड फेकला. हा दगड चैतन्य याच्या डोक्यात लागल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी त्याने अनिरुद्ध देशमुख याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
यानंतर रात्री 11 वाजता अनिरुद्ध जयसिंग देशमुख (वय 33, रा. तांबडा मारुती मंदिर, देशमुख गल्ली, आटपाडी) याच्या घरात घुसून चैतन्य धनंजय सुतार, अभिषेक धनंजय सुतार आणि अक्षय अण्णासाहेब दीक्षित (सर्व रा. सुतार गल्ली, आटपाडी) यांनी त्याला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अक्षय दीक्षित याने बांबूची काठी अनिरुद्ध याच्या डाव्या हातावर व पंजावर मारली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चैतन्य सुतार, अभिषेक सुतार व अक्षय दीक्षित या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आटपाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.