

आटपाडी : खानापूर विधानसभा मतदार संघात आटपाडी हे अत्यंत महत्त्वपूर्ण शहर असून या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. परंतु या शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करत असताना काही घटकांवर अन्याय होत असेल, तर या प्रारूप विकास आराखड्याला तातडीने स्थगिती घेणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.
आमदार सुहास बाबर यांनी काल उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आटपाडी शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये काही घटकांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रारूप विकास आराखड्यास तातडीने स्थगिती देऊन नव्याने सर्वमान्य प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्याचे आमदार सुहास बाबर यांना सांगितले.
बाबर म्हणाले, कोणत्याही शहराचा विकास करत असताना जो प्रारूप विकास आराखडा तयार केला जातो, त्यामध्ये काही जागा विकसित करण्यासाठी तसेच रस्ते आणि अन्य विकासकामे विकसित करण्यासाठी जागा आरक्षित केल्या जातात. परंतु जागा आरक्षित करत असताना कोणा तरी एकाच घटकावर अन्याय होत असेल किंवा आराखडा तयार करत असताना तो समतोल केला जात नसेल, तर याबाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून आपण आग्रही असून अन्यायकारक आरक्षणे लादली जाऊ नयेत अशी आपली भूमिका आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण आटपाडी शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या बाबतीत चर्चा केली आहे. याबाबत सविस्तर म्हणणे शासनाकडे रीतसर मांडण्यात आले आहे. या प्रारूप विकास आराखड्याला आपण स्थगिती घेणार आहे. विकास करत असताना सर्वसमावेशक आणि समतोल झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आटपाडी शहराच्या प्रसिद्ध होणार्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात आणि त्यामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही त्रुटी आहेत, यासाठी नामदार शिंदे यांच्याकडे आपण सविस्तर भूमिका मांडल्यानंतर शासन याबाबतीत सकारात्मक आहे. लवकरच कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेईल. आटपाडी शहरवासियांनी याबाबत मनात कसलीही शंका बाळगू नये. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांचे मत विचारात घेऊन विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना मिळतील असेही बाबर म्हणाले.