आटपाडी; पुढारी वृत्तसेवा: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात आज (दि.१७) डाळिंबासह ड्रॅगन फ्रुटची देखील आवक झाली. पंढरीनाथ नागणे यांच्या पुढाकारातून मंगलमूर्ती उद्योग समुहाच्या माध्यमातून डाळिंबासोबत इतर फळांचे सौदे सुरू झाले. आज त्यात ड्रॅगन फ्रूटची भर पडली.
आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी आले आहे. पारंपरिक शेतीसोबत माणदेशातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. फळ लागवड देखील वाढली आहे. शेतकरी वर्गांतून मागणी होत असल्याने बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ नागणे यांनी पुढाकार घेत बाजार समिती मार्फत अनेक फळांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
बाजार समिती सौदे बाजारात डाळिंबाचे नियमित तर चिक्कू, पेरू, सीताफळ, सफरचंद, आंबा आदी फळ पिकांचे सौदे हंगामानुसार होतात. तालुक्यात ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे आज ड्रॅगन फ्रुटचे सौदे सुरू करण्यात आले.
आज सांगोला तालुक्यातील महुद येथील शेतकरी वैभव वसंत लवटे यांच्या दर्जेदार ड्रॅगन फ्रुट फळाला प्रति किलो १२१ रुपये दर मिळाला. डाळिंब सौदे बाजारात माण तालुक्यातील भालवडी (शिंगणापूर) येथील अजय सुभाष काटे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो २५१ रुपये, नातेपुते (जि.सोलापूर) येथील बाबुराव पानसकर यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो २१० तर दिघंची (ता. आटपाडी) येथील मधुकर शिवदास शेटे यांच्या डाळिंबाला १५० रुपये दर मिळाला.
बाजार समिती मार्फत आता शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी विविध सोयी केल्या आहेत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बागेत आपला माल देण्याऐवजी तो माल बाजार समिती सौदे बाजारात विक्री करावा. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि रास्त भाव मिळवावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले.
डाळिंबातून जादा उत्पन्न मिळते. त्यामुळे विविध अडचणीवर मात करत शेतकरी डाळिंब लागवडीत पुन्हा जोमाने उभा राहिला आहे. तालुक्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. दर्जेदार मालाला रास्त भाव दिला जात असल्याने शेतकरी आटपाडी सौदे बाजाराकडे आकर्षित झाला आहे.
– पंढरीनाथ नागणे, मंगलमूर्ती उद्योग समूह
हेही वाचा