इस्लामपूर : लांबलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यात पीक पॅटर्न बदलणार असून, उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. काही शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट असून सोयाबीन, भुईमुगाला पर्याय म्हणून शेतकरी यंदाच्या खरिपात उसाकडे वळतील, अशी दाट शक्यता आहे. सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असणार्या तालुक्यात कृषी विभागाने उत्पादन वाढीसाठी केलेले नियोजन कचाट्यात सापडत चालले आहे.
वाळवा तालुक्यात खरिपाचे क्षेत्र 23 हजार 122 हेक्टर इतके आहे. परंतु आतापर्यंत 5 हजार 325 हेक्टर क्षेत्रातील म्हणजेच 23 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 600 ते 650 मि.मी. आहे. गेल्या चार वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी मात्र आतापर्यंत सरासरीच्या केवळ 17 टक्केच पाऊस झाला आहे. प्रथमच जुलै महिना आला तरीही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जुलै महिन्यात तुडुंब भरणारे बंधारे, पाझर तलाव अद्याप कोरडे ठणठणीत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पेरण्या झाल्या असल्या तरी पूर्व भागात मात्र पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे. पेरणीसाठी हवा असणारा पाऊस लांबत जाईल तसे सोयाबीन, भुुईमुगाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या खरिपात ऊस लागवडीकडे वळतील, अशी दाट शक्यता आहे.
बाजारपेठेत खते आणि बी-बियाणांचा साठा मुबलक असला तरी शेतकर्यांनी कृषी सेवा केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
त्यामुळे मान्सून लांबल्याचा फटका थेट कृषी केंद्रांनाही बसला आहे. पेरण्या खोळंबल्याने दुकानदारही पाऊस आणि शेतकर्यांची वाट पाहात असल्याचे चित्र आहे.
वाळवा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून शेतकर्यांनी पेरण्यासाठी घाई करू नये. चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्या कराव्यात. लांबलेल्या पावसाचा फटका भुईमूग, सोयाबीन पिकांना बसू शकतो.
-इंद्रजित चव्हाण,
तालुका कृषी अधिकारी.