सांगली : विजय ताड हत्या प्रकरण : ‘शूटर्स’ तुरुंगात...‘सुपारी’बहाद्दर मोकाटच! | पुढारी

सांगली : विजय ताड हत्या प्रकरण : ‘शूटर्स’ तुरुंगात...‘सुपारी’बहाद्दर मोकाटच!

सचिन लाड

सांगली :  विजय ताड…भाजपचे नगरसेवक… दिवसाढवळ्या धडाधड गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला सोमवार, दि. 17 जून रोजी चार महिने होऊन गेलेतरी मुख्य संशयित भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत पोलिसांच्या हाताला अजूनही लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताड यांच्यावर गोळ्या झाडणारे ‘शूटर्स’ तुरुंगाची हवा खात निवांत आहेत. ताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित सावंत हा गेला तरी कुठे, अशी चर्चा आहे. त्याला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी मृत ताड यांचे कुटुंब आज (सोमवार) दि. 17 जुलैपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहेत.

‘सुपारी’ देऊन ‘गेम’

जत-सांगोला या राष्ट्रीय महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर दुपारी दोन वाजता ताड यांची हत्या झाली. गोळ्या झाडणारे ‘शूटर्स’ अलगत सापडले. त्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) लावण्यात आला. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. ‘शूटर्स’ना मोठी ‘सुपारी’ दिल्याची माहिती पोलिस तपासातून उजेडात आली. या संदर्भात त्यांना काही ठोस पुरावेही मिळाले होते. मात्र जोपर्यंत सावंत सापडत नाही, तोपर्यंत खरे कारण उघड होणार नाही. ताड यांचा खून वेगळ्या कारणातून झाल्याचा संशय तपासातून पुढे आला. पण जोपर्यंत सावंत सापडत नाही, तोपर्यंत पोलिसांनी गुप्तता राखली आहे. त्यामुळे खुनामागील कारण अजूनही पुढे आलेले नाही.

दगडाने डोके ठेचले

घटनास्थळी गोळ्या झाडलेल्या तीन पुंगळ्या सापडल्या आहेत. तीन गोळ्या धडाधड घातल्याने ताड काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले. ते तडफडत असताना एका हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात दगड घातला. ते मृत झाल्याची खात्री पटल्याने हल्लेखोर पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात असल्याने सावंत यांची लवकर ओळख पटली नव्हती. ताड हे मुलांना शाळेत आणण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांची ‘गेम’ केली.

बबलूला दिली ‘सुपारी’

सध्या अटकेत असलेला बबलू चव्हाण यानेच ताड यांचा खून करण्यासाठी ‘सुपारी’ घेतली होती. ताड यांची हत्या करण्यापूर्वी तब्बल दीड महिना त्याने स्वत:चा मोबाईल बंद ठेवला होता, अशी माहितीही पोलिस तपासातून पुढे आली. यावरून ताड यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला. पण त्यावेळी हा मोबाईल ‘फ्लाईट’ मोडवर होता. पोलिसांनी फ्लाईट मोड काढल्यानंतर हा मोबाईल अटकेत असलेल्या आकाश व्हनखंडे याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी आपल्याला पकडले तर लोकेशन मिळू नये, यासाठी त्याने मोबाईल ‘फ्लाईट’ मोडवर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘सुपारी’ फुटली कुठे?

ताड यांच्या खुनासाठी ‘सुपारी’ घेतल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली. ही सुपारी फुटली कुठे? यासाठी कुठे बैठक झाली? रिव्हॉल्व्हरची जुळवा-जुळव केली कुठे? हल्लेखोरांना पैसे मिळाले का? या सार्‍या बाबींचा तपासातून उलघडा झाला का नाही, याबद्दल पुढे काहीच माहिती उजेडात आली नाही.

जिल्हाधिकार्‍यांना कुटुंबाचे निवेदन

मृत ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जिल्हाधिकार्‍यांना नुकतेच निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विजय ताड यांचा खून होऊन चार महिने होऊन गेले. अजूनही सावंतला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याला तातडीने अटक करावी, यासाठी आम्ही कुटुंबासह दि. 17 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत.

Back to top button