

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि दिवंगत आर आर पाटील यांची मैत्री ही एक वेगळीच ओळख निर्माण करणारी होती. मतभेद असूनही मनभेद न ठेवता त्यांनी एकमेकांबद्दल कायम आदर जपला. सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार झालेले हे अबोल नाते आजही आठवणीत जिवंत आहे.
मळणगाव (जि. सांगली) : दिलीप जाधव
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. र. आबा पाटील आणि अजित पवार यांच्या नाते संबंधाबाबत माध्यमांमध्ये तसेच नेते आणि कार्यकर्त्यांच्या खासगी चर्चांमध्ये अनेकदा दोघांमध्ये सलोख्याचे संबंध नसल्याची कुजबुज सुरू असायची. परंतु प्रत्यक्षात मात्र आबा आणि अजित दादा यांचे नाते अत्यंत घट्ट, विश्वासाचे आणि एकदिलाची मैत्री असे होते.
२००४ साली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील हे पहिल्यांदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपात राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रचार करून काँग्रेसपेक्षा एक जागा तरी जास्त निवडून आणणार, असा शब्द आबांनी अजितदादांना दिला होता.
त्यावर अजितदादांनी जर तुम्ही शब्द पूर्ण केला, तर मी तुम्हाला २५ लाख रुपये देईन, अशी पैज लावली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकल्या. पैज आबांच्या बाजूने गेली. त्यानंतर अजितदादांनी आबांना पैजेचे पैसे घेण्याची विनंती केली; मात्र आबांनी नम्रतेने नकार दिला. त्यानंतर त्या पैशातून अजित पवार यांनी आबांच्या चित्रकूट’ बंगल्यासमोर एक अलीशान गाडी उभी केली होती.
निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचा गटनेता कोण? यावर आमदारांत एकमत झाले नाही. शरद पवारांच्या सल्ल्यानुसार मतदान घेण्यात आले आणि त्यात आर. आर. पाटील यांनी बाजी मारली. सर्वाधिक आमदारांनी आबांची निवड केली. आबा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या प्रसंगानंतरही आबा आणि अजितदादांमध्ये कटुता निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.
सरकारमध्ये कार्यरत असताना आबा उपमुख्यमंत्री पदावर असले तरी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला त्यांनी मान दिला. चर्चा, विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जाते. राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी दोघांनी राज्यभर फिरत एकत्रितपणे काम केले. राष्ट्रवादीला खेड्यापाड्यात पोहोचवण्यात आणि अनेक ठिकाणी सत्तेत आणण्यात दोघांची जोडी उत्तम रित्या काम करत होती. अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा सर्वश्रुत आहे. आबांच्या तंबाखूच्या व्यसनाबद्दलही दादांनी खड्या भाषेत सुनावले होते. मात्र सुनावणी मध्येही मैत्रीचे गोड चलन होते.
आबांच्या निधनावेळी अंजनी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी आबांच्या पार्थिवाला खांदा देण्याचे काम जयंत पाटील यांच्या सोबत अजित पवार यांनीच केले. आबांच्या पश्चातही पाटील कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम अजित पवारांनी सातत्याने केले. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी कुटुंबीयांना ताकद आणि पाठबळ दिले.
दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत तासगावातील प्रचारसभेत अजित दादांनी ‘‘आबांनी माझा केसाने गळा कापला’’ असा उल्लेख केल्याने ट्रोलि झाले. पण यावेळी दादांच्या आवाजातही त्या वेळी आठवणींचा ओलावा आणि अबोल मैत्रीचे दु:ख दडलेले होते.
रोहित पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला असतानाही अजितदादांनी कधीच अंतर ठेवले नाही. विकासकामांसाठी निधी दिला, वेळ दिला आणि हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता. राजकारण हा आकड्यांचा आणि सत्तेचा खेळ असतो, पण काही नातेसंबंध शुद्ध भावनेतून उभे राहतात, जसे आर. आर. आबा पाटील आणि अजित पवार यांच्यात होते.