

अजित पवार यांच्या निधनानंतर जयंत पाटील आणि सुहास बाबर यांनी खंत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे उत्तम प्रशासक आणि मोठे लोकनेते होते, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
Jayant Patil and Suhas Babar on Ajit Pawar Death
सांगली : पुढारी वृत्तसेवा - राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. त्यांची उणीव कायम भासत राहील, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, 'महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजित पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा होती. असे असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे, ते नुकसान कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील'.
कामाचा, परखड, कठोर आणि निर्मळ मनाचा माणूस गेला-आमदार सुहास बाबर
खानापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर म्हणाले, ''दिवंगत अनिल भाऊ यांच्या पश्चात आम्हाला त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. एक कामाचा माणूस अगदी परखड, कठोर पण मनाने तितकाच निर्मळ आणि स्पष्ट बोलणारा माणूस आज आपल्यातून गेला. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख कार्यकर्त्यांना पचण्यासारखं नाही. दादा जरी वेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यामध्ये काम करण्याची एवढी प्रचंड मोठी शक्ती होती की, ते कोणत्या पक्षाचा आमदार आहे हे न पाहता जर ते काम योग्य असेल तर ते काम करण्याची धमक त्यांच्यात होती.
अगदी सात दिवसांपूर्वी मला अजित दादांचा फोन आला होता त्यांनी मला आटपाडीमध्ये काही करा आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्याबरोबर युती करा, असे सांगितले होते. त्यांचे जाणे हे कधीही न पटण्यासारखे आहे. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संपूर्ण खानापूर आटपाडी विसापूर मतदार संघाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.''