

Sanjay Raut on Ajit Pawar death news
मुंबई : "अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी कानावर आली. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण अळणी, बेचव होईल. रोखठोक बोलणारे, मिश्किल टिपणी करून आपलेसे करणारे असा त्यांचा स्वभाव होता. रोखठोक, दिलखुलास, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण अळणी होईल. महाराष्ट्राला अजून काय पाहावं लागेल माहिती नाही," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
राऊत म्हणाले की, "अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे ही दुर्दैवी बातमी कानावर आली. ज्या बारामतीशी त्यांचे अतूट नाते होते, त्याच बारामतीमध्ये त्यांचा असा अंत व्हावा, हे नियतीचे क्रूर चक्र आहे. इतक्या उमद्या वयात असा नेता आपल्यातून जाईल असे कधीच वाटले नव्हते."
अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आठवणींना उजाळा देताना राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे की, कॅबिनेटला पूर्ण अभ्यास करून येणारा हा नेता आहे. त्यांची कामाची शिस्त आणि कामावरची पकड वाखाणण्याजोगी होती."
अजित पवार हे उत्तम वक्ते होते. रोखठोक बोलणे आणि मिश्किल टिपणी करून समोरच्याला आपलेसे करण्याची त्यांची शैली वेगळी होती. शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले आणि त्यांनी स्वतःच्या पद्धतीने राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता.
"अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती; पण दुर्दैवाने ते या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. महाराष्ट्राला अजून काय काय पाहावं लागेल, हेच आता समजेनासं झालं आहे," अशी भावनिक प्रतिक्रियाही राऊत यांनी दिली. या घटनेबाबत त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे देखील या धक्क्यातून सावरलेले नसून, ते लवकरच प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपले दुःख व्यक्त करतील, असेही ते म्हणाले.