

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनांची धग वाढली असून विटा तालुक्यात साखळी उपोषण आंदोलन आज (दि.३१) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. तर लेंगरे येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाचा निषेध म्हणून रस्त्यांवर टायर्स जाळण्यात आले. शिवाय हिंगणगादे पाठोपाठ भाळवणी, नागेवाडीसह चिखलहोळ या गावानेही आता राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातल्याचे लावले आहेत.
आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आम्ही घेणारच अशा घोषणांनी परीसर दणाणून सोडत विट्यातील छत्रपती शिवाजी चौकातील महसूल भावना समोर साखळी उपोषण आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे- पाटील यांना समर्थन देण्यासाठी खानापूर तालुक्यातील सर्वत्र मराठा बांधव एकत्र आले आहेत. आरक्षण घेईपर्यंत लढाई सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सकल मराठा हा आपल्या हक्काच आरक्षण मागत आहे, शासनाने मराठा समाजाची दिशाभूल करु नये. आता सकल मराठा समाज एकवटला आहे, काहीही करा पण आम्हाला आरक्षण मिळालेच पाहीजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर लेंगरे गावामध्ये आज (दि.३१) आपत्कालीन सेवा वगळता सर्व व्यवहार बाजूला ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच लेंगरे ते विटा या रस्त्यावर टायर्स जाळण्यात आले. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यानंतर आज सायंकाळी मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील हिगणगादे, माहुली, नागेवाडी, भाळवणी, पाठोपाठ चिखलहोल या गावाने देखील सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी केली असून आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश किंवा जाहीर कार्यक्रम घेवून दिला जाणार नाही, अशा प्रकारचा सर्वानुमते ठराव केला असून त्या ठरावाची प्रत तहसीलदारांना पाठवण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
हेही वाचा :