खानापूर मतदारसंघातील जलसंधारणांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी मिळणार : आमदार अनिल बाबर

खानापूर मतदारसंघातील जलसंधारणांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी मिळणार : आमदार अनिल बाबर

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर मतदारसंघातील खानापूरसह आटपाडी तालुका आणि विसापूर मंडलातील जलसंधारणांच्या कामांसाठी जवळपास १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली .

याबाबत आमदार बाबर म्हणाले की, खानापूर मतदारसंघात आलेल्या टेंभूचे पाण्यामुळे बागायती क्षेत्र वाढत आहे. अशावेळी एकूणच पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी मतदारसंघातील जलसंधारणांच्या कामांसाठी जलसंधारण विभागाकडून जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संबंधित खात्याचे मंत्री शंकरराव गडाख यांनी हा निधी मोठ्या दूरदृष्टीकोनातून दिल्याचे ही आमदार बाबर यांनी सांगितले आहे. यात आटपाडी तालुक्यासाठी सुमारे ४० कोटी, खानापूर तालुक्यासाठी सुमारे १८ कोटी तर विसापूर मंडलासाठी जवळपास ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

खानापूर विधानसभा क्षेत्रात टेंभू योजनेचे पाणी आले आहे. सहाव्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुका ओलिताखाली येणार आहे. मात्र, टेंभू योजनेचे पाणी आवर्तनाने येणार आहे. उर्वरीत कालावधीत शेती आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी साठवण क्षमता वाढवण्याची गरज होती. त्यासाठी मतदारसंघातील काही बंधारे, पाझर तलाव आणि साठवण तलावांची दुरुस्ती आणि रूपांतरण गरजेचे होते. याबाबत माहिती घेऊन आपण जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना भेटलो होतो. त्यांनी मतदार संघातील गरज लक्षात घेऊन हा निधी मंजूर केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

तालुक्यातील आणखी काही ठिकाणी जुने बंधारे, तलाव आहेत. ज्या ठिकाणी भूसंपादन न करता पाणी साठवण क्षमता वाढवता येणे शक्य आहे. अशा ठिकाणांचे गाववार सर्व्हेक्षण करून पाणी साठवण तलाव, रूपांतरण तलाव आणि बंधाऱ्यांचे काम करणार आहे. यामुळे मतदारसंघाच्या पाणी साठ्यात वाढ होईलच, शिवाय भूजल पातळी देखील वाढणार आहे. याशिवाय अन्य काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र नाही, अशा ठिकाणी टेंभूच्या पाण्याचा स्रोत असल्याने साठवण करण्यास योग्य जागा असेल तर आपण तसे तलाव उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही आमदार बाबर म्‍हणाले.

आटपाडी तालुक्यात रूपांतरीत साठवण तलावासाठी म्हणून घरनिकी, विभूतवाडी दोन ठिकाणी निधी मिळणार आहे. पाझर तलावासाठी या तळेवाडी (चिमणनाला), चिंचाळे (रजपूत खोरा) यांना निधी मंजूर झाला आहे. चिंचाळे, कानकात्रेवाडी, बनपूरी (शीव), आटपाडी (केशा डोह आणि फॉरेस्ट मागे) या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी निधी मिळणार आहे. तर गळवेवाडी, तनपूरेवाडी येथे दगडी बंधारे होणार आहेत.

माळेवाडी (लोकरे शेत आणि चव्हाण शेत), गोनेवाडी (जवळे शेत), हिवतड. दिघंची (मारे शेत). महाडीकवाडी, लिंगीबरे, करगणी (खिलारे शेत) पिंपरी बु.(महादरा), जांभूळणी आणि विठ्ठलापूर येथे सिमेंट नाला बांध होणार आहेत. आटपाडी तालुक्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी ३९ कोटी ४४ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खानापूर तालूक्यातील रूपांतरीत साठवण तलावासाठी मादळमुठी आणि करंजे गावात निधी मिळेल.पोसेवाडी येथे गायरान जमिनीवर पाझर तलावाची पुर्नबांधणी होणार आहे. यासोबत सांगोले येथे गावात दोन ठिकाणी सिमेंट नाला बांध होणार आहेत, असे मिळून खानापूर तालुक्यातील कामांसाठी १७ कोटी ९५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, याशिवाय विसापूर मंडलातील नरसेवाडी येथे एक लघु पाटबंधारे तलाव आणि एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होणार आहे, तर हातनूर येथे रूपांतरीत साठवण तलाव होणार आहे. यासाठी ४२ कोटी ५७ लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news