गोर-गरिबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका : विवेक कोल्हे | पुढारी

गोर-गरिबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका : विवेक कोल्हे

कोपरगाव :

गेल्या दोन अडीच वर्षापासुन कोरोनाच्या महामारीमुळे कोपरगांव शहर बाजारपेठेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, निर्बंध शिथील होत आहेत, हातावर प्रपंच असणा-या घटकासमोर दररोजच्या जगण्याचा प्रश्न मोठया प्रमाणात आहे. यातच नगरपालिका प्रशासन शहरातील अगोदरच्या विस्थापितांचे पुर्नवसन करत नाही, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण हटविण्यांसाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने थेट अहमदनगर येथून पोलिसांची कुमक बोलावून गोर गरीबांच्या संसारावर जेसीबी फिरवून त्यांची राख रांगोळी करू नये असे निवेदन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सर्वपक्षीय अतिक्रमणधारकांच्यावतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी दिले.

याप्रसंगी बाळासाहेब संधान, विजय वाजे, सेनेचे गटनेते योगेश बागुल, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, मनसेचे शहराध्यक्ष सतिष काकडे, बापूसाहेब काकडे, अकबर लाला शेख, योगेश बागुल, सनी वाघ, शरद खरात, रिपाईचे प्रदेश सचिव दिपक गायकवाड प्रदेश रिपाईचे शहराध्यक्ष देवराम पगारे, आण्णाभाउ साठे प्रतिष्ठानचे सुकदेव जाधव, कैलास येवले, कहार भोई समाज प्रदेशाध्यक्ष अशोकराव लकारे, माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष संदिप वाकचौरे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व्यवसायिक, यांच्यासह विविध टपरीधारक तसेच विस्थापीत टपरीधारक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव पालिका नगररचनाचे अधिकारी श्री.बडगुजर यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते., त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव शहरातील अतिक्रमण धारकांच्या विरोधात कुणा एकाच्या सांगण्यावरून सुडबुध्दीतुन कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही. कोरोना महामारीमुळे अगोदरच सर्वाची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली आहे.

मार्च मध्ये कोपरगांव बसस्थानक इमारत उदघाटनाच्या पुर्व संध्येला शहरातील अतिक्रमणधारकावर नाहक हातोडा उगारण्यांत आला. त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय प्रमुखांना बोलाविण्यांत आले होते. त्यानंतर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची दोन तीन वेळा बैठक घेवुन यावर सामोपचाराने तोडगा काढुन पुर्वीच्या विस्थापितांचे अगोदर पुर्नवसन करावे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकावर हातोडा टाकू नये म्हणून विनंती केली होती.

कोपरगांव शहरातील अतिक्रमणधारक त्यांच्या दैनदिन रोजीरोटीसाठी रस्त्यावर माल विकतात मात्र वाहतुकीस कुठेही अडथळा होणार नाही याची ते सतत दक्षता घेत असतात, पण कुणाला खुश करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा पुन्हा अतिक्रमण उठविण्याची कारवाई करू नये, शहरासह मतदार संघात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, अपघातांसह शहरात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री अपरात्री चो-या, दरोडे, खुन मारामा-यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यावर नेमकेपणाने पोलिस प्रशासन व संबंधीत यंत्रणi बघ्याची भूमिका घेत असतांना पालिक प्रशासन अतिक्रमण उठविण्यासाठी थेट अहमदनगर येथून पोलिस बळ मागावून सुड युध्दीची कारवाई करत आहे हे बरोबर नाही, तेंव्हा पालिका प्रशासनाने अतिक्रमण उठविण्याची मोहिम तात्काळ स्थगित करावी अन्यथा येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे शेवटी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.

Back to top button