सांगली : बँकेच्या अध्यक्षांच्या गाडीवर 48 लाखांची उधळपट्टी | पुढारी

सांगली : बँकेच्या अध्यक्षांच्या गाडीवर 48 लाखांची उधळपट्टी

सांगली ; पुढारी वृत्तसेवा  : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या पूर्वीप्रमाणेच गैरप्रकार आणि उधळपट्टी चालू झाली आहे. बँकेच्या अध्यक्षांसाठी एक अलिशान गाडी असताना सुमारे 48 लाख रुपये खर्च करून नवीन फॉर्च्युनर गाडी घेतली आहे. विद्यमान अध्यक्ष यापूर्वी ज्या गोष्टीसाठी तत्कालीन अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रारी करीत होते, तेच आता त्यांचे अनुकरण करीत आहेत, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे.

उधळपट्टी चालू

फराटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बँकेत नुकतेच निवड झालेल्या संचालक मंडळाकडून स्वच्छ व पारदर्शी कारभार होईल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. मात्र सध्या अपेक्षाचा भंग होत आहे. अध्यक्षांसाठी अलिशान गाडी असताना नव्याने गाडी खरेदी करून उधळपट्टी चालू आहे. तसेच शिराळा येथील जिल्हा बँकेच्या इमारतीसाठी साडेसात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नियमबाह्य व बेकायेदशीर

ते म्हणाले, बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील यांच्या निवासाची बँकेने 25 लाख रुपये खर्च करून व्यवस्था केली आहे. मात्र दर महिन्याला निवासभत्ता म्हणून सुमारे 10 हजार रुपये खर्ची टाकले जात आहेत. तसेच ते गावाकडे जाताना सर्व खर्च बँकेच्या नावे टाकीत आहेत. जिल्ह्यातील बँकांना भेटी देताना दैनंदिन भत्त्यापेक्षा जास्त रक्कम कडू-पाटील खर्ची टाकत आहेत. फराटे म्हणाले, जिल्हा बँकेत पदोन्नती देण्यात आली होती. त्या संदर्भात कोर्टामध्ये केस चालू आहे. तसेच कर्मचारी युनियनच्या अनेक तक्रारी असताना काटे यांना व्यवस्थापकपदी बढती देण्यात आली आहे. ही घटना नियमबाह्य व बेकायेदशीर आहे.

विनाकारण त्रास

संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये सुमारे 1100 कोटी रुपयांचे कर्ज साखर कारखान्यांना मंजूर केले आहे. मात्र विकास सेवा सोसायट्यांना सामान्य कर्ज मंजूर करताना 80 टक्के वसुली असली पाहिजे, अशी अट घातली आहे. शेतकर्‍यांना पीक कर्ज मंजूर करताना रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांचे परिपत्रके दाखवून शेतकर्‍यांना पीक कर्ज देताना नाहरकत दाखला मागवून विनाकारण त्रास दिला जात आहे, असा आरोप फराटे यांनी केला आहे.

हेही वाचा ; 

Back to top button