सांगली जिल्ह्यात पुन्हा गवा प्रकटला ! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

सांगली जिल्ह्यात पुन्हा गवा प्रकटला ! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा 

सांगली जिल्ह्यात पुन्हा गवा प्रकटला आहे. चिकुर्डे (त‍ा. वाळवा) परिसरात सोमवारी सकाळी गव्याने दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी चिकुर्डेलगत ठाणापुढे परिसरात विठोबा मंदिराच्या पाठीमागे शेतामध्ये लोकांना दोन गवे व लहान पिल्ली यांचे दर्शन झाले.

गव्यांचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाताना लोक घाबरत आहेत. याची माहिती कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना समजताच त्यांनी चिकुर्डे, ठाणापुढे परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गवा दिसताच पोलिसांना संपर्क साधण्याचे आणि लोकांनी शेतात जात असताना खबरदारी  घेण्याचे आवाहन  त्यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच सांगलीवाडीत गव्याचे दर्शन झाले होते. चिंचबागेजवळ आलेला गवा शहरात घुसू नये यासाठी नागरिकांना त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तो कदमवाडी रस्त्यावरील उसाच्या शेतात गेला होता. रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो मिळून आला नाही.

गवा दिसल्याची बातमी वार्‍यासाठी पसरली. यंत्रणा पुन्हा घटनास्थळी दाखल झाली. परंतु गवा आढळून आला नाही. गवा सांगलीवाडीतच ठाण मांडून असल्याचा येथील रहिवाशांनी दावा केला होता. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गव्याचा वावर वाढला आहे. सांगली शहरालगत कसबेडिग्रज, विश्रामबाग परिसरात गवा आढळून आला होता. आता चिकुर्डी गावात गवा आढळून आल्याने त्याची भिती निर्माण झाली आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापूर शहरात आलेला गव्याची आसपासच्या गावात भटकंती सुरूच

Back to top button