

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गव्याने ( bison ) कोल्हापूर शहरातून गुरुवारी पहाटे चांगलाच फेरफटका मारला. गुरुवारी रात्री दोन वाजता पितळी गणपतीजवळून बाहेर पडलेला गवा तब्बल 18 तासांनी शिंगणापूरजवळ पोहोचला. सुमारे दीड वर्षे वयाचा हा लहान गवा शहराबाहेर जावा, यासाठी पहाटेपासून सर्व शासकीय यंत्रणा या गव्याच्या मागावर आहेत. या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरणार्या या गव्याने नागरिकांना ठिकठिकाणी मनसोक्त दर्शन दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गवा शिंगणापूर येथील चंबुखडी ते बालिंगा (ता. करवीर) या दरम्यान होता.
शुक्रवारपासून शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणारा एकल गवा ( bison ) पेठवडगाव, भादोलेमार्गे शिगावच्या दिशेने सांगली जिल्ह्यात गेला. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा कोल्हापुरात दुसर्या गव्याचे दर्शन झाले. शुक्रवारी शहरात घुसलेला हाच गवा परत आला की हा नवा गवा आहे, याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. तथापि, गुरुवारी पहाटेपासून शहरात वावरणारा हा गवा नवा असून तो आकाराने लहान असल्याचे स्पष्ट झाले.
रात्री दोन वाजता पितळी गणपती चौकात वावर ( bison )
बुधवारी दिवसभर कसबा बावडा- कदमवाडी या मार्गावर चव्हाण पाणंदीजवळ शेतात ठाण मांडलेला हा गवा रात्री उशिरा बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत या परिसरात दिसला. यानंतर रात्री दोनच्या सुमारास ताराबाई पार्क येथील पितळी गणपती चौकात गवा दिसला. यानंतर तो आरटीओ कार्यालय, विवेकानंद महाविद्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जयंती नाला, सीपीआर चौकमार्गे सिद्धार्थनगर येथून तो ओढ्याकाठाने पहाटे चारच्या सुमारास शेतात शिरला.
शहरातील दिवसा वर्दळीने प्रचंड गजबजलेल्या मार्गावरून गवा आला. मात्र, ती वेळ पहाटेची असल्याने आणि वन, पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक मागे असल्याने गवा शांतपणे रस्त्यावरून चालत होता. पंचगंगा नदी पार करून गवा वडणगेच्या हद्दीत गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास या परिसरात त्याचे दर्शन झाले. यानंतर शिवाजी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही काळ गव्याने या परिसरातील शेतात ठाण मांडले.
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास वडणगेकडे जाणारा पोवार पाणंदीचा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. यामुळे गव्याला पुढे सरकण्यास मदत झाली. काही वेळाने गवा पोवार पाणंद पार करून आंबेवाडी पेट्रोल पंपामागे असलेल्या शेतात गेला. यानंतर गवा या परिसरात काही काळ थांबला. तो कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याच्या बाजूला शेतात येऊन थांबला. त्याच्या हालचाली पाहता तो कोल्हापूर-रत्नागिरी रस्ता पार करेल असा अंदाज होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद केला ( bison )
दुपारी दीडच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबविण्यात आली. पन्हाळा, रत्नागिरीकडून येणारी वाहतूक आंबेवाडी पेट्रोल पंपाजवळ तर कोल्हापूरकडून जाणारी वाहतूक पोवार पाणंदीजवळील पेट्रोल पंपासमोर थांबवण्यात आली. दोन्ही बाजूला थांबलेल्या नागरिकांना वन व पोलिस कर्मचार्यांनी शांत राहण्याच्या सूचना दिल्या. गवा विचलित होईल, असे कोणतेही कृत्य करू नका असेही बजावण्यात आले.
गव्याने दिमाखात तीन वेळा पार केला रस्ता ( bison )
दोन्ही बाजूची वाहतूक थांबल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत गवा रस्त्यावर आला. दोन्ही बाजूला मान फिरवत अगदी दिमाखात अर्ध्या मिनिटात त्याने रस्ता पार केला. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मंगल कार्यालयाच्या दिशेने तो शेतात गेला. यावेळी काहीजण पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, वन व पोलिस कर्मचार्यांनी कोणालाही पुढे जाऊ दिले नाही. रस्ता पार करून शेतात गेलेला गवा काही अंतर पुढे जाऊन परत मागे फिरला आणि पुन्हा रस्त्यावर आला. रस्ता पार करून तो पुन्हा आंबेवाडी, वडणगेच्या बाजूच्या शेतात बसला. त्यानंतर दहा मिनिटांनी तो पुन्हा रस्त्यावर आला. रस्ता पार करून तो पंचगंगा नदीच्या दिशेने शिंगणापूरकडे गेला. रस्ता पार करताना गव्याचे अनेकांनी चित्रीकरण केले. फोटो काढले.काही वेळातच ते व्हायरलही झाले. दरम्यान, आज पहाटेपासून कोल्हापुरातील रस्ते तसेच वडणगे परिसरात गव्याने अनेकांना वारंवार आणि मनसोक्त असेच दर्शन दिले.
गवा पंचगंगेच्या दिशेने गेल्यानंतर वन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्याच्या मागावर आंबेवाडी, चिखलीच्या दिशेने निघाले. दरम्यान, पंचगंगा नदी पार करून गवा पुन्हा शिंगणापूरच्या दिशेने गेला. रात्री आठच्या सुमारास गवा शिंगणापूर येेथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माळावर दिसला. यानंतर तो कोर्ट कॉलनी परिसरातून नागदेववाडीमार्गे पुढे सरकला. कर्मचार्यांनी त्याला तसेच कळ्याच्या दिशेने नेण्याचे नियोजन केले. कर्मचारी त्याच्या मागे होते. दरम्यान, दोनवडे परिसरात फटाक्यांचा आवाज झाला आणि पुढे जाणारा गवा पुन्हा माघारी फिरला. तो नागदेववाडी येथील समर्थ कॉलनी परिसरात येऊन पुन्हा शेतात जाऊन बसला. रात्री उशिरापर्यंत तो याच परिसरात होता, असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कळपातून भरकटलेला गवा ( bison )
हा गवा अवघ्या दीड वर्षाचा असावा तसेच तो कळपातून भरकटलेला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. गवा लहान असूनही तो अधिक रुबाबदार दिसत होता. दरम्यान, शहरात दोन गवे आल्याची चर्चा होती. मात्र, दिवसभरात एकच गवा असल्याचे स्पष्ट झाले.
गव्याचा कळप कळे भागात असल्याची शक्यता ( bison )
ज्या कळपातून हा गवा भरकटला आहे, त्यांचा कळप कळे परिसरात असावा, अशीही शक्यता आहे. कारण हा गवाही कळ्याच्या दिशेनेच मार्गक्रमण करत असल्याचे दिवसभर त्याच्या हालचालीवरून दिसत होते.
वरिष्ठ अधिकार्यांकडून पाहणी ( bison )
गवा शहरात आल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही ठिकठिकाणी पाहणी केली. उपवनसरंक्षक आर. आर. काळे यांनी वडणगे परिसरात सकाळी जाऊन पाहणी केली. कर्मचार्यांना सूचना केल्या.
दक्षता घ्या, योग्य कार्यवाही करा : पालकमंत्री
दरम्यान, कोल्हापूर परिसरात सुरू असलेल्या गव्यांच्या धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी रात्री वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून आढावा घेतला. गवा बिथरणार नाही, तो नागरी वस्तीत शिरणार नाही, याबाबत दक्षता घ्या. जीवित हानी होणार नाही, याचीही खबरदारी घ्या. त्यानुसार योग्य ते नियोजन करा, त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, पाटील यांनी भुयेवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या स्वरूप खोत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
वन विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासून मोहिमेवरच
नागरी वस्तीत गवा शिरल्याने वन विभागाच्या पाच क्षेत्रावरील वनपालांना बोलवून घेण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून हे सर्व अधिकारी, कर्मचारी गव्याचा माग काढत होते. रात्री काही काळ घरी परतले, दरम्यान, पुन्हा त्यांना रस्त्यावर यावे लागले. बुधवारी सकाळपासून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हे अधिकारी गवा परतवण्याच्या मोहिमेवरच होते.