तासगाव; पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2022 ची नवीन डायरी प्रकाशित केली आहे. डायरीमध्ये विधान परिषद सदस्यांच्या यादीतून भाजपचे विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकरांचे नाव वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुरुवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीवेळी बॅक प्रशासनाने यावर्षीच्या नवीन डायरीचे प्रकाशन केले. सर्व संचालकांस डायरीचे वाटप करण्यात आले. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन डायरी दिलेल्या आहेत.
या डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांची नावे प्रसिध्द केली आहेत. परंतू विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये आमदार मोहनशेठ कदम, आमदार अरुण लाड, आमदार सदाशिव खोत ही नावे आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळण्यात आले आहे.
याबाबत बॅंकेचे चेअरमन मानसिंग नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, मी अद्याप नवीन डायरी बघितलेली नाही. परंतू जर अशी काय चूक झाली असेल तर ती सुधारण्यात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतराव कडू पाटील म्हणाले, याबाबतची माहिती समजताच सर्व डायरी परत मागविण्यात आल्या आहेत. ही चूक दुरुस्त करुन नविन डायरी प्रकाशित करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ही बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचे पित्त आहे. यामुळे ते यापेक्षा वेगळे काही करुच शकत नाहीत.