इंटरनेटवरील अभिव्यक्ती सर्वांसाठीच हवी! | पुढारी

इंटरनेटवरील अभिव्यक्ती सर्वांसाठीच हवी!

अप्रमेय राधाकृष्ण
सहसंस्थापक व सीईओ ‘कू’

सोशल मीडियाचे लोकशाहीत आता महत्त्वाचे स्थान निर्माण झालेले आहे. निव्वळ राजकारणापुरतेच नाही; तर खेळ, सण-उत्सव, विविध घटना अशा सर्वच विषयांवर आपल्या भाषेत आपले विचार आणि मत प्रत्येक भारतीयाला सोशल मीडियावर व्यक्त करता आले पाहिजे. इंटरनेटवर इंग्रजी बोलता आणि लिहिता येणार्‍यांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेले आहे, ते प्रत्येक भारतीयालासुद्धा मिळाले पाहिजे.

प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा स्वतःचा एक मूड आहे. फेसबुकवर आपण कुटुंबीय आणि मित्रांशी कनेक्ट होतो. त्यांच्या संदर्भातील अपडेट, इतर माहिती मिळवावी अशा स्वरूपाचे हे ओपन नेटवर्क आहे. तेच इन्स्टाग्राम हे लाईफस्टाईल कम्युनिकेशनसाठी आहे. तिथे आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटींना फॉलो करतो आणि लाईफस्टाईल संदर्भात अपडेट मिळवतो. व्हॉट्सअ‍ॅपला आपण वन टू वन कम्युनिकेशन किंवा ग्रुप कम्युनिकेशनसाठी प्राधान्य देतो आणि हे क्लोज नेटवर्क असते. जर आपण ट्विटर पाहिले तर विचार आणि मत व्यक्त करण्यासाठीचे ‘इंग्लिश फर्स्ट’ असे हे नेटवर्क आहे.

भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत आपले विचार आणि मते मांडता यावीत, आपल्या भाषांतील कम्युनिटिशी जोडून घेता आले पाहिजे. प्रादेशिक भाषा बोलणार्‍यांना जे ब्रँड जवळचे वाटतात, त्यांना फॉलो करता आले पाहिजे. उदाहरणार्थ, मराठी भाषिकांना महाराष्ट्रात काय सुरू आहे यावर मराठी भाषेत सहजपणे व्यक्त होता आले पाहिजे. या हेतूने कू अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

सोशल मीडियामुळे फिल्टर बबल तयार होऊन समाजात ध्रुवीकरण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोशल मीडियाची मालकी असणारी कंपनी ज्यावेळी फक्त नफ्याचा विचार करून काम करते, त्यावेळी समाजावर होणारा परिणाम हा दुय्यम ठरतो. अशा स्थितीमध्ये कंपनीचा नफा कसा वाढेल यादृष्टीने ऑप्टिमायझेशन केले गेलेले असते. सोशल मीडियाची रचना ही तुम्ही जास्त वेळ सोशल मीडियावर घालवाल अशा प्रकारे केलेली असते. त्यासाठी उत्सुकता वाढवणारा कंटेंट जास्तीत जास्त दाखवला जातो; पण सोशल मीडियाचा खर्‍या समाजमनावर काय परिणाम होतो, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कंपनीचा नफा कमी झाला तरी चालेल; पण एकूण ऑप्टिमायझेशन हे सामाजिक स्वास्थ्य लक्षात घेऊन केले पाहिजे.

कू हे अ‍ॅप सर्वात पारदर्शक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, असा आमचा दावा आहे. ‘कू’वर तुम्ही 10 लोकांना फॉलो करत असाल तर या दहा लोकांनी जी पोस्ट केली आहे, ती तुमच्या टाईमलाईनवर क्रमाने दिसते. त्यात आमचे तंत्रज्ञान काही हस्तक्षेप करत नाही.
ट्रोलिंग आणि शिवीगाळ कशी रोखायची?

सोशल मीडियावरील शिवीगाळ, ट्रोलिंग, सायबर दादागिरी हेही गंभीर मुद्दे आहेत. विशेषतः, महिला आणि इतर कमकुवत वर्गातील व्यक्तींना याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे बर्‍याच वेळा लोक सोशल मीडियापासून दूर राहतात, असे आपल्याला दिसते.
भारतातील ज्या प्रादेशिक भाषा आहेत, त्यांचे शब्द आणि शब्दसमूह, शब्द गट यांचा सर्वांत मोठा डेटाबेस आमच्याकडे आहे. याचा वापर करून त्या-त्या भाषांतील शिवीगाळ, अश्लील प्रकारात येतील अशा शब्दांचा शब्दकोश बनवून त्या आधारे आमच्या मशिन लर्निंगला प्रशिक्षित करणे आणि अशा शब्दांचा वापर होत असेल तर ते थांबविणे

असा एक प्रयत्न सुरू आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस या संस्थेसोबत आम्ही काम करत आहोत. आमच्याकडे असलेला हा डेटाबेस आम्ही सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला उपलब्ध करून देऊ. जे वापरकर्ते आहेत, त्यांनाही सोशल मीडियावर व्यक्त होताना काय भाषा वापरली पाहिजे, यासाठी प्रशिक्षण देण्याचीही गरज आहे. त्यानंतर जे वारंवार शिवीगाळ करतात, त्यांच्यावर निर्बंधही घालावे लागतील.

सोशल मीडियाला लोकशाहीत महत्त्वाचं स्थान

सोशल मीडियाचे लोकशाहीत आता महत्त्वाचे स्थान निर्माण झालेले आहे. निव्वळ राजकारणपुरतेच नाही तर खेळ, सण-उत्सव, विविध घटना अशा सर्वच विषयांवर आपल्या भाषेत आपले विचार आणि मत प्रत्येक भारतीयाला सोशल मीडियावर व्यक्त करता आले पाहिजे. इंटरनेटवर इंग्रजी बोलता आणि लिहिता येणार्‍यांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेले आहे, ते प्रत्येक भारतीयालासुद्धा मिळाले पाहिजे.
‘कू’वर सध्या आम्ही कोणत्याच जाहिराती घेत नाही. त्यामुळे ट्विटरसारख्या कंपन्यांनी राजकीय जाहिरातीवरील बंदीचा जो निर्णय घेतला आहे, तो सध्या तरी आमच्यासाठी मुद्दा नाही. ‘कू’वर तुमचे अकाऊंट सुरू करा, त्यावर सक्रिय राहा, चांगला कंटेंट द्या, तुमचे फॉलोअर्स वाढवा अशा प्रकारे ‘कू’चे काम चालते.

मेटाव्हर्सच्या भारतीय रूपाचा विचार

येत्या काळात आपण मेटाव्हर्सच्या जगात प्रवेश करत आहोत. भारतीय कंपनी म्हणून मेटाव्हर्सचे भारतीय रूप कसे असेल याचा विचार आम्ही करत आहोत.

आपण सध्या प्रत्यक्षात व्हर्च्युअल विश्वात जगत आहोतच. कुटुंबासमवेत असतानाच आपण मोबाईलवर इन्स्टाग्राम, फेसबुक पाहत असतो. म्हणजे आपण एकाच वेळ खर्‍या आणि व्हर्च्युअल विश्वात आताही वावरत आहोतच. तर मेटाव्हर्समधील व्हर्च्युअल विश्व हे अधिक इमर्सिव्ह असणार आहे.

मेटाव्हर्सनंतर बरेच बदल अपेक्षित आहेत. उदाहरणार्थ, इन्स्टाग्राम आपण सध्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहतो. मेटाव्हर्समध्ये आपण हेच इन्स्टाग्राम कसे पाहू किंवा ‘कू’वर पोस्ट कशी टाकू, आपण सध्या फेसबुक लाईव्ह करतो; पण मेटाव्हर्समध्ये एखादा गायक त्याची संगीतरजनी व्हर्च्युअली एखाद्या स्टेडियममध्ये ठेवू शकेल आणि तुम्ही तिथे व्हर्च्युअली उपस्थिती लावू शकाल.

अशा प्रकारे बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सध्याच्या कंपन्यांना शोधावी लागणार आहेत.

मेटाव्हर्सच्या विश्वात आर्थिक संधीही तेवढ्याच मोठ्या असतील. मेटाव्हर्सच्या जगातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकही करता येईल. तिथे हॉटेलही असतील; जिथे तुम्ही कॉफी विकत घेऊ शकाल. मेटाव्हर्सच्या विश्वात अशा प्रकारे स्वतःचे अ‍ॅप अनेकांना सुरू करावे लागेल आणि त्यातून उत्पन्नाच्या संधी मिळतील.

व्यावसायिक किंवा जे व्यावहारिक संबंध आहेत, त्यांना व्हर्च्युअल म्हणून लवकर स्वीकारलं जाईल. तर जे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध आहेत, ते मात्र खर्‍या जगातीलच राहतील.

(शब्दांकन : मोहसीन मुल्ला)

Back to top button