सांगली : उत्पादक अन् ग्राहकांची लूट : खरेदी होतेय 43.50 रु. ने तर विक्री 57 रुपयांना

सांगली : उत्पादक अन् ग्राहकांची लूट : खरेदी होतेय 43.50 रु. ने तर विक्री 57 रुपयांना

सांगली : विवेक दाभोळे

दुधाची खरेदी आणि विक्री यात खरेदीदार तसेच विक्रेत्यांकडून सर्रास लिटरला 16 ते 17 रुपयांचा ढपला हाणला जात आहे. यातून दूधउत्पादक उपाशी तर विक्रेते तुपाशी अशीच स्थिती कायम आहे. याखेरीज ग्राहकांनादेखील यातून चढ्या दरानेच दुधाची खरेदी करावी लागते आहे. शासनाच्या संबंधित विभागाचे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

दुध खरेदी व विक्री

आता दुधाच्या जादा उत्पादनाचा हंगाम सुरू झाला आहे. दुधाची मागणी वाढत तर आहेच. मात्र, दरात तुलनेने वाढ होत नाही. तर उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेल्याने उत्पादकांसाठी दूधउत्पादन आतबट्ट्याचे ठरू लागले आहे. मात्र, यावर कडी म्हणजे दूधखरेदीदारांकडून खरेदी दरात आणि विक्रेत्यांकडून विक्रीदरात खुलेआम मनमानी होत आहे. जिल्ह्यात दुधाचे साधारणपणे प्रतिदिन संकलन साडे चौदा लाख लिटरच्या दरम्यान होते. आता दूधउत्पादनवाढीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात दररोज 15 लाख 80 हजार लिटरच्या घरात दुधाचे संकलन होत आहे. मात्र, उत्पादकांकडून कमीदरात दूध खरेदी आणि दुसरीकडे ग्राहकांना महागड्या दराने दुधाची विक्री सुरू आहे. यातून उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांची पद्धतशीरपणे लूट होत आहे. तर लिटरमागे सरासरी 12 रुपये कमी मिळू लागल्याने जिल्ह्याचा विचार केला तर दूधउत्पादकांना दिवसाला पावणे दोन कोटींच्या घरात फटका बसू लागला आहे.

राज्य शासनाने म्हैस आणि गाय दुधासाठी प्रमाणित दर निश्‍चित केले आहेत. मात्र, त्या दरातदेखील उत्पादकाला दुधाचे उत्पादन परवडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयानुसार म्हैस दुधासाठी 6.00 फॅटचे दूध स्टॅण्डर्ड मानले जाते. या सहा फॅटसाठी (9.20 एसएनएफ) चा दर 40.00 रु. प्रतिलिटर आहे. या पटीत खरेदी दर त्या-त्या तुलनेत वाढून मिळतो. तर 6.50 फॅटसाठी (9.00 एसएनएफ) चा दर 43.30 रुपये प्रतिलिटर आहे. सात फॅटसाठी 46.00 रु. आणि 7.5 फॅटसाठी 47.50 रु. दर निश्‍चित करण्यात आला आहे.
दूध खरेदी करून, प्रक्रिया करून बाजारात मात्र याच (6.00 ते 6.50 फॅटचे) दुधाची विक्री होतेय तब्बल 57 ते 58 रुपयांनी. यातून विक्रेते, संघचालकांना 17 ते 18 रुपयांचा थेट नफा होतो. गाय दूध खरेदी तर संकलक, विक्रेत्यांसाठी बावनकशी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरते आहे. गाय दुधाची खरेदी 3.50 फॅट आणि 8.50 एसएनएफ स्टॅण्डर्ड मानून निश्‍चित करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार 3.50 फॅट (8.50 एसएनएफ) चा दर 27.00 रु. प्रतिलिटर आहे. मात्र गाय दूध खरेदी करून, प्रक्रिया करुन बाजारात मात्र त्याच (3.00 ते 3.50 फॅटचे) दुधाची विक्री होतेय तब्बल 46 ते 47 रुपयांनी विक्री होते. यात विक्रेते, संघचालकांना जवळपास दुप्पट थेट नफा होतो.

टोण्ड्मधून सर्रास लूट…

प्रामुख्याने गाय दुधाची विक्री ही टोण्ड् आणि डब्बल्टोण्ड् या दोन प्रकारातून होते. सिंगल टाण्ड् 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफची विक्री होतेय 48.00 रुपयांनी. मात्र, त्याची खरेदी झालेली असते अवघी 27 ते 28 रुपयांनी! डब्बल्टोण्ड् म्हणजे तर विक्रेत्यांसाठी चंगळच आहे. हे दूध 1.50 फॅटचे असते. मात्र, दर तुलनेने जादाच! विशेष म्हणजे याची फॅट, दर्जा पाहणारी यंत्रणा काय करते हे संशोधनाचे ठरते. गायीच्या दूध विक्रीत थेट 15 ते 16 रुपयांचा फायदा विक्रेत्यांना आणि ठिकठिकाणच्या दूध संघचालकांना होत आहे. एकीकडे दूध उत्पादकांची लूट होते आहे.तर ग्राहकांना लिटरला किमान 16 ते 17 रुपयांचा  ढपला बसत आहे

गणित दुधाचे (फायदा एकाला अन् नफा दुसर्‍याला) जिल्ह्यात प्रतिदिन संकलन 15 लाख 80 हजार लिटरच्या घरात

खरेदी अन् विक्रीतही लिटरला 16 ते 17 रुपयांचा ढपला

  • उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही लिटरमागे सरासरी 16 रुपयांचा फटका
  • शासनाच्या निर्णयानुसार म्हैस दुधासाठी 6.00 फॅटचे दूध स्टॅण्डर्ड
  • म्हैस दूध 6.00 फॅटसाठी (9.20 एसएनएफ) दर रू : 40.00 रु.
  • म्हैस दूध 6.50 फॅटसाठी (9.00 एसएनएफ) दर रू : 43.30 रु.
  • सात फॅटसाठी 46.00 रू. आणि 7.5 फॅटसाठी 47.50 रु.

 दूध खरेदी, प्रक्रियेनंतर दरात वाढ दुप्पट…

  • बाजारात मात्र दुधाची (6.00 ते 6.50 फॅटचे) विक्री : 57 ते 58 रु.नी
  • विक्रेते आणि दूधसंघचालकांना थेट नफा ः17 ते 18 रुपये
  • गाय दुधाची खरेदी 3.50 फॅट आणि 8.50 एसएनएफ स्टॅण्डर्ड निश्‍चिती
  • गाय दूध 3.50 फॅट (8.50 एसएनएफ) चा दर… 27.00 रु. प्रतिलिटर
  • गाय दूध खरेदी करून, प्रक्रिया करून बाजारात विक्री रु…46 ते 47 रुपये

विक्रेते, संघचालकांना जवळपास दुप्पट थेट नफा

  • सिंगल टोंण्ड् 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफची खरेदी 27 ते 28 रु.
  • सिंगल टोंण्ड् 3.5 फॅट 8.5 एसएनएफ विक्री मात्र 48 रुपये.

आधी वाढीव दराची अंमलबजावणी करा

राज्य शासनाने तातडीने आधी दुधाला दर वाढवून द्यायला हवा. कारण दुधाचा उत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे. शेतकर्‍यासाठी दूधउत्पादन कमालीचे खर्चिक बनले आहे. पशुखाद्य तर महाग झाले आहे. महापूर, कोरोनाचा फटका बसला आहे. दुधाचा धंदा आतबट्ट्याचा ठरला आहे. गाय दुधाचा एसएनएफ कमी होत आहे. याचा विचार करून सरकारने दूधदरात तुटपुंजी वाढ न करता भरीव वाढ करण्याची गरज आहे. मात्र दूध दरवाढ केल्यानंतर बाजारात पशुखाद्याच्या दरात वाढ होणार नाही याचीही सरकारने दक्षता घ्यावी. वाढत्या खर्चाचा विचार करून सरकारने दूध खरेदी दरात प्रतिलिटर किमान 20 रुपयांची दरवाढ करण्याची गरज आहे. लिटरला उत्पादकाला सरासरी 40.00 रु. मिळणे गरजेचे आहे.
– संदीप राजोबा, युवा नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news