कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेनेला भरभरून दिले; एका जागेसाठी अट्टाहास का? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेनेला भरभरून दिले; एका जागेसाठी अट्टाहास का?

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी म्हणून गेल्या दोन वर्षांत शिवसेनेला जिल्ह्यात भरभरून दिले असतानाही केवळ एका जागेसाठी केलेला हा अट्टाहास शेतकर्‍यांना त्रासदायक ठरू नये, यासाठी सर्वांनी छ. शाहू शेतकरी विकास आघाडीसोबत राहावे. ( जिल्हा बँक निवडणूक ) कोणीही गाफील राहू नये, आपले संख्याबळ आहेच; मात्र पूर्ण क्षमतेने पॅनेल निवडून आणूया, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

गडहिंग्लज येथे शनिवारी सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी छ. शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ झाला.

दहा हजार कोटी ठेवी अन् 200 कोटी नफ्याचे उद्दिष्ट ( जिल्हा बँक निवडणूक )

बँकेच्या ( जिल्हा बँक निवडणूक ) राजकारणाचा शेतकर्‍यांवर दूरगामी होत असल्यानेच विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तेथील जिल्हा बँका सुद़ृढ झाल्या नसल्याने पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती होऊ नये म्हणून जिल्हा बँकेत पक्ष, गट-तट बाजूला ठेवून बिनविरोधासाठी प्रयत्न केले होते. जिल्हा बँकेत आमचीच सत्ता येणार असतानाही विरोधातील पॅनेल कशासाठी उभे राहिले, हेच कळत नाही. सहा वर्षांपूर्वी अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेत कोणी जाण्यास तयार नव्हते. आम्ही सचोटीने प्रयत्न करून जिल्हा बँकेला नफ्यात आणले. पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठून 200 कोटी नफा मिळविण्याचे आपले उद्दिष्ट आहे.

आ. राजेश पाटील म्हणाले, बिनविरोधला द़ृष्ट लागली अन्यथा जिल्हा बँकेत वेगळे चित्र असते. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, अनेक वर्षे जिल्हा बँकेच्या विरोधात लढलो; मात्र बँकेचे महत्त्व मला कळले म्हणूनच मी कायम सोबत आहे.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मुश्रीफ यांनी सर्वसमावेशक आघाडीचा प्रयत्न केला. मात्र, काहींना रुचले नसल्याने स्वतंत्र पॅनेल उभे केले. आ. प्रकाश आवाडे म्हणाले, केडीसी बँकेसाठी मुश्रीफ यांच्यामुळे बँकेला ऊर्जितावस्था आली आहे. माजी खा. निवेदिता माने म्हणाल्या, बँक अडचणीत असताना उमेदवारीसाठी कुणी पुढे येत नव्हते. मात्र, मुश्रीफ यांनी बँकेला फायद्यात आणल्यानंतर आता उमेदवारीसाठी उड्या सुरू आहेत. आम्ही शिवसेनेमध्ये असतानाही काळाची गरज म्हणून बँकेसाठी हा निर्णय घेतला आहे. आ. विनय कोरे म्हणाले, दारात हलगी वाजवून मुश्रीफांनी कर्जवसुली केली नसती, तर आज बँकेला अडचणीतून कोणीही बाहेर काढू शकले नसते. व्यक्तिगत त्रास घेऊन मुश्रीफांनी बँक फायद्यात आणली आहे. शिवसेनेने स्वतंत्रता जोपासण्याचा केलेला प्रयत्न या घडीला शेतकर्‍यांसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उमेदवार संतोष पाटील, मदन कारंडे, प्रदीप भुयेकर, श्रुतिका काटकर, आ. राजू आवळे, विजयसिंह माने, स्मिता गवळी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सतीश पाटील यांनी स्वागत केले. भैया माने यांनी प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.

शिवसेनेच्या तिघांचे आभार ( जिल्हा बँक निवडणूक )

या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांनी एकीकडे चुकीच्या पद्धतीने विरोधकांनी निवडणूक लावली असताना जिल्हा बँकेच्या भल्यासाठी संजय घाटगे, निवेदिता माने, संग्रामसिंह कुपेकर या शिवसेनेच्या तिघांनी आमच्यासोबत येत बँकेवर विश्वास दाखविल्यामुळे या तिघांचे आभार मानले. याशिवाय शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य क्लेशदायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button