सांगली : कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान | पुढारी

सांगली : कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा

कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (मंगळवार) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, महात्मा गांधी विद्यालय, शिव प्रभू शाळा आदी 13 मतदान केंद्रावर दुपारी 1 वाजेपर्यंत चुरशीने 49 टक्के मतदान पार पडले. 7 हजार 809 मतदारापैकी 3 हजार 810 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 1905 तर महिलाही 1905 मतदारांचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी 7.30 वाजल्‍यापासून मतदानास सुरुवात झाली. थंडीच्या वातावरणामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही. मात्र 11 नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढू लागली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान पार पडले. यामध्ये 2276 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. दुपारी 1 पर्यंत 49 टक्के मतदारांनी मतदान केले.

कडेगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना होत आहे. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस येथे निवडणूक लढवत असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. तर शिवसेनेने ही तीन प्रभागात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे मोठी चुरस वाढली आहे. मतदान सुरू झाल्यापासून प्रत्येक पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी करीत आपापले मतदारानी मतदान करावे यासाठी वाहनांची व्यवस्था केली. तर मतदान आपल्यालाच व्हावे यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत होते. दरम्यान मतदानावेळी मतदारांत मोठा उत्साह दिसून आला. अनेक नवीन युवक व युवती मतदारांनी आनंदाने आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बाजवला.

दिग्गज नेते मंडळींची मतदान केंद्राला भेटी

मतदानादिवशी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, युवा नेते डॉ जितेश कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड या दिग्गज नेतेमंडळीनी मतदान केंद्राला भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ

कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या तिरंगी लढतीमुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. यामुळे मतदान केंद्रासमोर तिन्ही बाजुने मतदान खेचण्यासाठी चढाओढ दिसत होती.

मोठा पोलीस बंदोबस्त

कडेगाव नगरपंचायत निवडणूक मतदानादिवशी कुठेही गैरप्रकार होऊ नये व कायदा सुव्यस्था राहावी यासाठी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button