इस्लामपूर पालिका सभेत लग्नावरून गोंधळ | पुढारी

इस्लामपूर पालिका सभेत लग्नावरून गोंधळ

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

लग्नाला जाण्यासाठी पालिकेची सभा तहकूब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी केल्यानंतर इस्लामपूर पालिका सभेत गोंधळ झाला. सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एक तासासाठी सभा तहकूब केली.

इस्लामपूर पालिकेची तहकूब झालेली सभा सोमवारी घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला सभागृहाचा अपमान करणाऱ्या नगरसेवकांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विषय पत्रिकेतील विषय घेतल्यानंतर ऐनवेळीच्या विषयावेळी हा विषय मांडावा असे स्पष्टीकरण दिले. विषय पत्रिकेवरील क्रमांक ६ ते १० विषय रद्द करण्यात आले. विषय पत्रिकेतील १३ विषय सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी नगरसेवकांना लग्नाला जायचे आहे; त्यामुळे सभा तहकूब करावी, अशी मागणी पीठासन अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर सभेत गोंधळ सुरू झाला.

शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार म्हणाले, शहरांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना लग्न महत्त्वाचे आहे. त्यांनी विषय पत्रिकेतील विषय रद्द करावेत किंवा सभा सुरू करावी. राष्ट्रवादीकडून वेळकाढूपणा धोरण अवलंबले आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, प्रशासनाशी निगडित जे विषय आहेत, त्यांना मंजुरी देऊ आणि सभा तहकूब करू. त्यानंतरही राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी लग्नाला जायचे आहे. त्यामुळे सभा तहकूब करावी, या मागण्यांवर ठाम होते. सभा तहकूब करण्यासाठी त्यांनी पीठासन अधिकाऱ्यांना पत्र दिले.त्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी चर्चा करण्यासाठी एकतास सभा तहकूब केली.

हेही वाचलं का? 

Back to top button