म्हाडा परीक्षा रद्द : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्‍याबाहेर एनसीपी कार्यकर्ते- अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत हाणामारी | पुढारी

म्हाडा परीक्षा रद्द : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्‍याबाहेर एनसीपी कार्यकर्ते- अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत हाणामारी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवस्थाना बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भिडले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानीच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

पोलीस बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आव्हाडांच्या बंगल्याच्या बाहेर तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती जास्त चिघळू नये यासाठी पोलिसांनी अखेर विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्‍यामुळे या ठिकाणची परिस्‍थिती तणावपूर्ण बनली आहे.

दरम्यान, खासगी संस्थेला पेपर सेट करण्याचे काम न देता यापुढे म्हाडाच परीक्षा घेणार असल्याची मोठी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. पेपर फुटीबाबत माझ्याकडे तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या, त्यामुळे मी स्वतः आणि पोलीस यंत्रणा यांनी योग्य तपास करून पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

विशेष म्हणजे पुण्यात तब्बल 2 लाख पोलिसांची परीक्षा घेणारी हीच संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून असा प्रकार होणे अनाकलनीय असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. म्हाडाचा पेपर फुटला नसून गोपनीयतेचा भंग झाला असून तशाप्रकारचा गुन्हा संबंधित संस्थेच्या विरोधात नोंदवण्यात आला असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

म्हाडाची परीक्षा रद्द होणार असे ट्विट करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच परिक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले. रविवारी म्हाडाच्या परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली असल्याने पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले.

Back to top button