तासगावमध्‍ये लाचखाेर मंडल अधिकार्‍याला ‘एसीबी’ने पाठलाग करुन पकडले | पुढारी

तासगावमध्‍ये लाचखाेर मंडल अधिकार्‍याला 'एसीबी'ने पाठलाग करुन पकडले

तासगाव; पुढारी वृत्तसेवा

सोसायटीच्या कर्जाचा ई – करार नोंद न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेणारा तासगावचा मंडल अधिकारी गब्बरसिंग तुकाराम गारळे (वय ३७ रा. वासुंबे ता. तासगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्‍यानंतर गब्बरसिंग गारळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्‍याला पकडले.

कुमठे (ता तासगाव) इथल्या तक्रारदाराने गावातील सोसायटीममध्ये जमीनीवर कर्ज मिळणेबाबत अर्ज केला होता. सदरच्या कर्जासाठी सातबारा उताऱ्यावर ई-कराराची नोंद होणे आवश्यक होते.तक्रारदार यांनी ई करार नोंद न होणेबाबत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.या अर्जावर ई-करार न होण्यासाठी मंडल अधिकारी (Tasgaon divisional officer) कार्यालय तासगांव यांचेकडे तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची सुनावणी गब्बरसिंग गारळे यांचे समक्ष सुरू होती.

तक्रारीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी गारळेंनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी याबाबतची तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला. त्यांच्या या तक्रारीची पडताळणी केली असता, सुरुवातीला १० हजाराची मागणी करुन चर्चेअंती ८ हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गारळे यांनी तक्रारदाराला सांगितलेल्या तासगावातील कॉलेज चौकात सापळा लावला.

 मंडल अधिकारी दुचाकी आणि पैसे टाकून पळाला;  भररस्त्यात थरार

तक्रारदाराला ८ हजार रुपये घेऊन गारळे यांच्याकडे पाठवण्यात आले. काही वेळानंतर तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच घेताना, गारळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण लाच घेताना सापडल्याचे लक्षात येताच, त्यांनी भिलवडी नाक्यातील धनगर वाड्याकडे धूम ठोकली.  यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. भर रस्त्यात हा थरार सुरु होता. लाचलुचपतचे पथक जवळ आल्यानंतर मंडल अधिकारी गारळे हे रस्त्यावर दुचाकी आणि पैसे टाकून पळून गेले.मात्र लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी शेवटी गारळे यांना पाठलाग करुन पकडले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, सलीम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, सीमा माने यांच्या पथकाने केली.

हेही वाचलं का? 

Back to top button