काँग्रेसने ( congress ) आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर केल्यास 2024 मध्ये लोकसभेच्या निम्म्यापैकी निम्म्या म्हणजे 136 जागा जिंकता येऊ शकतात. काँग्रेसला सोबत न घेता शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि अन्य प्रादेशिक नेत्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय राजकारणात निरर्थक, अप्रासंगिक ठरू शकतो.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचा दौरा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतरच्या वार्तालापात त्यांनी यूपीए अस्तित्वातच नसल्याचे वक्तव्य केले. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला ( congress ) लक्ष्य केले; पण काँग्रेस आजही पूर्णांशाने सक्रिय आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकांप्रमाणेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील निकालांमधून असे संकेत मिळतात. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये तृणमूल काँग्रेसकडून केली जात असलेली घुसखोरी, तसेच त्रिपुरा, गोवा, आसाम आणि अन्य ठिकाणी तृणमूलच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांबद्दल बरेच काही लिहिले गेले. काँग्रेसचे ( congress ) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी प्रयत्नशील असलेली तृणमूल काँग्रेस त्रिपुरा, गोवा, आसाम आणि अन्य राज्यांत मोठ्या महत्त्वाकांक्षेसह निवडणुकीच्या शर्यतीत सामील झाली. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जाण्याने सर्वांत जुन्या अशा काँग्रेस पक्षाचे मनोबल खच्ची होईल, असाही प्रचार केला जात आहे.
ममता बॅनर्जी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये ( congress ) फूट पडल्यामुळेच अस्तित्वात आला आहे, हे विसरता कामा नये. प्रणव मुखर्जी, सीताराम केसरी आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्या राजकारणामुळेच ममता बॅनर्जी यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. त्यात नेहरू-गांधी कुटुंबाची किंवा राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल किंवा प्रियांका गांधी यांची कोणतीही भूमिका नव्हती. ममतांचे सोनियांबरोबर अनेक दशकांपासून चांगले संबंध राहिले आहेत. ममतांचे कार्यालय आणि त्यांच्या घरीही राजीव गांधी यांचे छायाचित्र आजही प्रामुख्याने पाहायला मिळते. विचारधारेचा विचार करताना तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यास तो सामाजिक आणि आर्थिक बाबतीत काँग्रेससारखाच आहेे. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यात ममता बॅनर्जींमुळे मदत होत आहे, तोपर्यंत ममतांची आगेकूच सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना अजिबात खटकणार नाही, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. केजरीवाल पहिल्या दिवसापासूनच दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, गोवा, गुजरात आदी राज्यांत काँग्रेसवर टीका करण्यात अग्रेसर राहिले आहेत. यातील गोवा वगळता अन्य राज्ये तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने वर्ज्यच राहिली आहेत.
काँग्रेस ( congress ) आणि बिगर-भाजप, बिगर-एनडीए पक्षांची वाटचाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलेली आहे, हे या ठिकाणी आपण विसरता कामा नये. काँग्रेस आपल्या अंतर्गत व्यवस्थेची घडी बसविण्यासाठी आणि नेतृत्वाच्या मुद्द्याचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करीत आहे. काँग्रेसला केरळ, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अन्य काही राज्यांमधून लोकसभेच्या 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, व्ही. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव आणि अन्य नेत्यांच्या बिगर भाजप, बिगर एनडीए पक्षांना संसदेतील एकूण जागांपैकी 150 जागा जिंकण्याची गरज भासेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वालाही लोकसभेच्या 50 जागा जिंकण्याची तृणमूलची इच्छा समजू शकते. असे झाल्यास बिगर एनडीए आणि बिगर काँग्रेसी पक्षांमध्ये ममता बॅनर्जींना समान दर्जा प्राप्त होईल. काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबाचा विचार करायचा झाल्यास पक्षाला स्वबळावर 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्यानंतरच पंतप्रधानपदाची संधी मिळू शकेल. हेच काँग्रेसचे लक्ष्य असेल.
काँग्रेस ( congress ) पंजाबात पराभूत झाली किंवा उत्तराखंडमध्ये सत्तेत परतण्यात अपयश आले किंवा गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये अपयश आले, तर कहाणी पूर्णपणे बदलून जाईल. अशी अवस्था काँग्रेसमध्ये फूट पडल्याने किंवा पक्षांतरे झाल्याने उद्भवू शकते. आतापर्यंत काँग्रेसच्या ज्या नेत्यांची निष्ठा अढळ होती, त्यांचा धीर सुटत चालल्याचे दिसू लागले आहे. त्यातूनच मतभेद आणि निष्क्रियता निर्माण झाली. काँग्रेसने पंजाब आणि राजस्थानात अशाच प्रकारची संकटे झेलली. काही व्हर्च्युअलअंतर्गत बैठकांमध्ये मामला इतका पुढे गेला की, नेत्यांनी एकमेकांविषयी अपशब्द काढले. सोनिया गांधींनीसुद्धा या गोष्टी पाहिल्या. अठराव्या लोकसभेत 100 पेक्षा अधिक खासदारांचा आकडा गाठण्यासाठी आणि चर्चेत कायम राहण्यासाठी काँग्रेसला बरेच काही करावे लागणार आहे. त्यासाठी आतून आणि बाहेरूनही पक्षावर दबाव आहे. पक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्यात राहुल गांधींनी दर्शविलेली अनुत्सुकता वातावरण आणखी विचित्र बनवीत आहे. विरोधाभासाच्या वातावरणातच पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकांना सामोरा जाणार आहे. काँग्रेस राज्यांमधील अशा प्रादेशिक सहकारी पक्षांच्या भरवशावर असेल, ज्यांचा दबदबा निवडणुकीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, व्ही. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव आदी नेत्यांनी संसदेतील जागा मोठ्या संख्येने ताब्यात घेण्यात यश मिळविले, तर काँग्रेसला राजस्थान, हरियाना, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत चांगली कामगिरी करावी लागेल, जिथे काँग्रेसची थेट टक्कर भाजपशी आहे. काँग्रेसने डाव्या पक्षांसह बिगर एनडीए पक्षांबरोबरही सेतू जोडून ठेवला आहे. विविध राज्यांत महाआघाड्या करता याव्यात, हा त्यामागील उद्देश आहे. त्यासाठी गरज पडल्यास सोनिया गांधींना पुढे आणले जाऊ शकते. संघटनेची डागडुजी, नेतृत्वाचा तिढा सोडविणे, पंजाबात सत्ता कायम राखणे आणि उत्तराखंडमध्ये जिंकणे यासाठी काँग्रेसने आपल्या क्षमतांचा केलेला वापर पक्षाला 2024 मधील लोकसभेच्या निम्म्यापैकी निम्म्या म्हणजे 136 च्या आसपास जागा जिंकण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. काँग्रेस पक्षाला सोबत न घेता शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि अन्य प्रादेशिक नेत्यांच्या पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय राजकारणात निरर्थक आणि अप्रासंगिक ठरू शकतो.
– रशिद किडवई,
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक