

विटा: पुढारी वृत्तसेवा : विटा येथील विवेकानंदनगरात गादी बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. भर वस्तीत आज (दि.१२) सायंकाळी ही आग लागल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पुरुषोत्तम भानुशाली यांचा हा कारखाना कराड रस्त्यावर आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
या कारखान्यामध्ये कापडी चिन्हांपासून कापूस आणि त्यापासून गाद्या बनवण्यात येतात. आज सायंकाळी अचानवक आग लागल्याने तत्काळ विटा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर बामणी येथील उदगिरी शुगर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.
आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर बाहेर येत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. भरवस्तीत कारखाना असल्याने मदत कार्यात अडचण येत होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे,अशी माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
हेही वाचा