पणजी : सांगोल्डा कोमुनिदाद जागेतील बेकायदेशीर 22 घरे हटवण्याला सुरूवात | पुढारी

पणजी : सांगोल्डा कोमुनिदाद जागेतील बेकायदेशीर 22 घरे हटवण्याला सुरूवात

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा हायकोर्टाच्या आदेशानुसार सांगोल्डा कोमुनिदाद जागेत बांधण्यात आलेली बेकायदेशीर 22 घरे हटवण्याच्या कामाला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली. ही बेकायदेशीर घरे हटवण्याच्या वेळी घरे बांधकाम कर्त्यांकडून बराच विरोध झाला. काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आला होता.

सांगोल्डा कोमुनिदाद जागेत काही जणांनी बेकायदेशीर बांधकामे करून घरे बांधली होती. या प्रकरणी सांगोल्डा कोम्युनिदादने त्यांना नोटीस पाठवून इशारा दिला होता. त्यानंतर 2012 पासून बेकायदेशीर घरे हटवण्याकरिता न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. आपली घरे हटवली जाऊ नयेत या करीता सदर 22 घर मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्याचे निर्देश दिले होते. घरे हटवणी जाऊ नयेत याकरता त्यांनी बऱ्याचदा मुदतवाढ मागून घेतली होती. परंतु शेवटी न्यायालयाने ही घरे हटवण्याचा आदेश दिला अशी माहिती सांगोल्डा कोम्युनिदादचे मुखत्यार नेविल डिसोजा यांनी पत्रकारांना दिली.

ही बेकायदेशीर 22 घरे हटवण्याच्या वेळी बांधकाम कर्त्यांकडून विरोध होणार याकरिता उपाधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी बार्देश मामलेदार उपस्थित होते. काही महिलांनी घरे हटवण्याच्या वेळी बराच विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व कारवाई सुरूच ठेवली.

हेही वाचा :

Back to top button