Lok Sabha Election 2024 : वसंतदादांची पुण्याई फळाला येण्याची चिन्हे! सांगली वेगळ्या वळणाच्या वाटेवर

file photo
file photo

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याबद्दल मतदारांतून सखेद आश्चर्य आणि असंतोषही व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दादाप्रेमी काँग्रेसजनांनी ही निवडणूक आपल्या हाती घेण्याची सिद्धता सुरू केलेली दिसत आहे. तसे झाल्यास दादा घराण्यासाठी दादांची पुण्याई फळाला आली, असे म्हणावे लागेल. सध्या सांगलीची निवडणूक वेगळे वळण घेऊन राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सांगली जिल्हा आणि वसंतदादा पाटील यांचे एक अतूट जिव्हाळ्याचे नाते आहे. दादांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी दिलेले अमूल्य योगदान कुणीही विसरू शकत नाही. आज सांगली जिल्ह्यात विकासाचा जो काही पानमळा फुलला आहे, त्याचा पाया दादांनी घातला आहे, हे दादांचे आणि दादा घराण्याचे राजकीय विरोधकही नाकारू शकत नाहीत. दादांनी एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. एकेकाळी राज्यभरातील काँग्रेस उमेदवारांच्या याद्या सांगलीत तयार होऊन इथूनच जाहीर होत होत्या. केवळ उमेदवारीच नव्हे, तर अनेकांच्या पदरात मंत्रिपदाच्या खिरापतीही सांगलीतूनच पडत होत्या. केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही दादांचा दबदबा होता. आज राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असलेली काही ज्येष्ठ नेतेमंडळी दादांच्या तालमीत तयार झालेली आहेत, हेही नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सांगलीचा दबदबा कालही होता आणि आजही आहे. ही सगळी दादांची पुण्याई!

वारसच उपेक्षित!

असे असताना आज दादा घराण्याचे वारसदार विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली, याबद्दल केवळ जिल्हाच नव्हे, तर राज्यभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे; मात्र या उमेदवारी नाकारण्यामागे काँग्रेस पक्षापेक्षा दादा घराणेविरोधी काही कळीच्या नारदांचा हात असल्याची पक्की खात्री सांगलीकरांच्या मनात घर करून बसली आहे. स्व. वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढीतही सुरू असल्याचे कुणीच नाकारू शकत नाही. या संघर्षातूनच जिल्ह्यातील काही नेत्यांनी विशाल पाटील म्हणजेच दादा घराण्याला डावलण्यासाठी डावपेच केल्याची उघड चर्चा आहे. दुसरीकडे वसंतदादा आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष तर जगजाहीर आहे. पवारांनी आपल्या उभ्या-आडव्या राजकीय कारकिर्दीत कधीही दादा घराण्याला संधी दिल्याचे दिसत नाही. उलट दादा घराण्याचे अधिकाधिक खच्चीकरण होण्यासाठीच त्यांच्याकडून प्रयत्न झालेले दिसतात. विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारून दादा घराण्याची राजकीय कोंडी करण्यामागे हेच सगळे कारस्थान आहे.

दादा घराण्याची कोंडी!

सांगलीकर जनतेने गेल्या पन्नास एक वर्षात स्व. वसंतदादा पाटील आणि त्यांच्या वारसदारांवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळेच प्रकाशबापू पाटील पाचवेळा, मदन पाटील दोनवेळा आणि प्रतीक पाटील दोन वेळा लोकसभेत जाऊन पोहोचले. शिवाय विष्णूअण्णा पाटील आणि मदन पाटील विधानसभा आणि विधान परिषदेत धडक मारू शकले होते. प्रकाशबापू, विष्णूअण्णा आणि मदन पाटील हयात असेपर्यंत दादा घराण्याच्या जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाला कुणी शह देऊ शकले नव्हते; पण या तिघांच्या पश्चात दादा घराण्याची पद्धतशीर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आजही सुरू आहेत. पण, सांगली जिल्ह्यातील जनतेच्या मनात आजही स्व. वसंतदादांच्या पुण्याईच्या आठवणी ताज्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य काँग्रेसप्रेमी जनताच आता ही निवडणूक हातात घेण्याच्या तयारीत दिसते आहे. तसे झाले तर ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दादाप्रेमी उठावाच्या तयारीत!

आज जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे राजकीय पक्ष कार्यरत असले आणि कुणाचे बलाबल कमी-जास्त दिसत असले तरी मुळातच हा जिल्हा काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे. गावागावांत आजही काँग्रेसचे गडकोट भक्कम आहेत. राजकीय सोयीनुसार नेतेमंडळींनी इकडे तिकडे उड्या मारल्या असतील; पण तळागाळातील सर्वसामान्य जनता आजही काँग्रेसची विचारधारा मानणारी दिसते, त्यामुळेच बंडाळी अटळ दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news