ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न | पुढारी

ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न

दिलीप भिसे

इरळी (ता. कवठेमहांकाळ) :  सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकाला हादरवून सोडणार्‍या सांगली जिल्ह्यातील इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एम.डी. ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीच्या उलाढालीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळ्यांमधील दोन माफियांचे कनेक्शन मुंबई गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत उघड झाले आहे. इरळीतील कारवाईनंतर विशेष पथकाने राजस्थान आणि गुजरातमध्ये छापेमारी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव याच्या शेतातील अड्ड्यांवर सहा महिन्यांपासून आरोग्याला घातक ठरणार्‍या ड्रग्जच्या निर्मितीचा उद्योग सुरू होता, अशीही माहिती चौकशीतून पुढे येत आहे.पुणे आणि कुपवाड पोलिसांनी 21 फेब—ुवारी 2024 रोजी कुपवाड येथील स्वामी मळ्यात पत्र्याच्या शेडवजा खोलीवर छापा टाकून सुमारे 300 कोटी रुपये किमतीचा 140 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी मुख्य संशयित आयुब मकानदारसह तीन स्थानिक तस्करांना जेरबंद करण्यात आले. कुपवाड येथील ड्रग्ज तस्करीची शोधपथकांद्वारे पोलखोल सुरू असतानाच मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळीच्या उलाढालीचा मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाला सुगावा लागला.

कुपवाडपाठोपाठ महिन्यात ड्रग्ज सापडले

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाला सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी-डोर्ली रस्त्यालगत इरळी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीतील वासुदेव जाधव याच्या द्राक्षबागेलगत असलेल्या अड्ड्यावरील ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीचा छडा लागला. पथकाने छापा टाकून सुमारे 254 कोटी रुपये किमतीचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. कुपवाडपाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय माफियांचे कनेक्शन

मुंबई पोलिसांनी अड्ड्याचा मालक व मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव (वय 34), प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (35), प्रसाद बाळासाहेब मोहिते (24), विकास महादेव मलमे (25), अविनाश महादेव माळी (28) यांना अटक केली आहे. वासुदेव जाधव याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय माफियांसह स्थानिक कनेक्शनही पुढे येत आहे.

बिल्डर, सेलिबि—टींसह उद्योजकांकडूनही खंडणी

ड्रग्ज तस्करीतील माफियांनी यापूर्वी बिल्डर, सेलिबि—टींसह उद्योजक, व्यावसायिकांना धमकावून मोठमोठ्या खंडण्या वसूल केल्याचे त्याच्याविरुध्द मुंबईसह राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली, हरियानासह पंजाबमध्ये गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे समजते. वासुदेव जाधव याच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीच्याआधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान, गुजरात तसेच मुंबईतही काही ठिकाणी छापेमारी केली. मुंबईतून चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच संशयित असे एकूण 9 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

जाधव याची अल्पावधीतील श्रीमंती

जेमतेम शिक्षण असलेला वासुदेव द्राक्षे, बेदाणे विक्रीचे काम करीत होता. भागभांडवलासाठी त्याने 35 ते 40 लाखाचे
कर्ज उचलले होते. व्यवसायात तोटा झाला. या काळात त्याच्या मुंबईसह गुजरात व राजस्थानात फेर्‍या सुरू झाल्या. वर्षापूर्वी आलिशान मोटार खरेदी केली. त्यानंतर तयार द्राक्षबागेसह 4 एकर शेत खरेदी केले. द्राक्षबागेजवळच शेडवजा दोन मोठ्या खोल्या बांधल्या. या खोलीतून मिक्सर मशीन, ग्रायंडरसह अन्य मशिनरी तसेच सुमारे 245 कोटी रुपये किमतीचा 122.5 किलो ड्रग्ज निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. अल्पावधीतील त्याची श्रीमंती नजरेत भरणारी आहे. (पूवार्ध)

पुत्र मालामाल होऊनही आई, वडील मोलमजुरीत

ड्रग्ज तस्करीतून मालामाल झालेल्या मुख्य संशयिताने अलीकडच्या काळात काही निवडक मित्रांवर मौजमजा आणि चैनीसाठी मोठमोठ्या रकमांची उधळण केल्याची परिसरात चर्चा आहे. मुलापासून विभक्त राहणारे त्याचे आई, वडील आजही मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यापूर्वी ढालेवाडी येथे त्याने टुमदार बंगलाही खरेदी केला आहे.

Back to top button