Sangli News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळापत्रकाप्रमाणे : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Sangli News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळापत्रकाप्रमाणे : चंद्रशेखर बावनकुळे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर झाली तरी, भाजप व मित्रपक्ष सज्ज आहेत. ‘मोदी गॅरंटी’वर भाजप पुन्हा प्रचंड बहुमताने केंद्राची सत्ता राखेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे मंगळवारी व्यक्त केला. (Sangli News)

भाजप व मित्रपक्ष असलेल्या महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बावनकुळे यांच्याहस्ते झाले. सांगलीत मार्केट यार्डात श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या कार्यालयात महायुतीचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील, माजी गटनेत्या भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, युवा नेते प्रभाकर पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, अरुण बालटे, आकाराम मासाळ, अरुण राजमाने, सुरेंद्र वाळवेकर, राजाराम गरूड व नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Sangli News)

बावनकुळे म्हणाले, सांगलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले, याचा अर्थ लगेचच निवडणूक जाहीर होईल असे नाही. मी काही केंद्रीय निवडणूक आयुक्त नाही, मात्र अंदाज सांगू शकतो. पासष्ट वर्षात विरोधकांना जे काम जमले नाही, ते काम दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींनी विकासाची बरीच कामे मार्गी लावली आहेत. जनतेच्या मतांचे आमच्यावरील कर्ज पुन्हा सत्तेत आल्यावर विकास कामांच्या माध्यमातून फेडू. यासाठीच या निवडणुकीत जाहीरनामा काय असावा, कोणती कामे जनतेला केंद्र सरकारकडून अपेक्षित आहेत, याबाबत जनतेकडून सूचना मागविण्यात येत आहेत. त्यासाठी नमो अ‍ॅप सुरू केले आहे.

निवडणूक एप्रिलमध्ये?

महाराष्ट्रात 2019 मध्ये 11, 18, 23 व 29 एप्रिल रोजी चार टप्प्यात लोकसभा निवडणूक झाली होती. बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मार्चमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशमुख, जगताप अनुपस्थित

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित नव्हते. राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित नव्हते, मात्र त्यांचे चिरंजीव माजी सभापती हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ मंगळवारी मुंबईत होते.

हेही वाचा :

Back to top button