जत पूर्व भागासाठी कर्नाटकातून पाणी देण्याचा राज्याचा प्रस्ताव तयार | पुढारी

जत पूर्व भागासाठी कर्नाटकातून पाणी देण्याचा राज्याचा प्रस्ताव तयार

जत : पुढारी वृत्तसेवा – जत विधानसभा क्षेत्रातील जनतेला आश्वासित केल्याप्रमाणे गेल्या चार वर्षात तालुक्यातील विविध प्रश्नांना न्याय देता आला आहे. विशेषता पाण्याच्या प्रश्नावर आजवरच्या सर्वच अधिवेशनात सतत या भागाचा विषय सभागृहात लावून धरला. याचे फलित म्हणूनच आज मुळ म्हैसाळ योजना अंतिम टप्प्यात येत आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहचले आहे. आता उर्वरीत ६४ गावांसाठी राबवण्यात येणारी विस्तारीत योजनाही गतीने करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तोवर कर्नाटककडे शिल्लक असणारे पाणी जत तालुक्याला तुबची योजनेतून देण्याच्या मागणीला आता यश आले आहे. राज्य सरकारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाने पाणी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. यासंदर्भात शुक्रवार दि.२९ रोजी मुंबईत बैठक होत असून, चालू आवर्तनात कर्नाटकातून पूर्व भागात पाणी आणू असा ठाम विश्वास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

संबंधित बातम्या –

नुकतेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन झाले. यानंतर जत येथे पत्रकार परिषदेत नुकतेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन झाले. यानंतर जत येथे पत्रकार परिषदेत आ. सावंत यांनी तालुक्यासाठी केलेल्या अनेक कामांची माहिती दिली. यावेळी आ. सावंत म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत लोकांनी जतच्या पाण्याच्या प्रश्नावर मला विधीमंडळात पाठवले होते. याकाळात जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाईल, असे काम केले नाही. सतत पाण्याच्या प्रश्नावर राज्याच्या सभागृहात आवाज उठवला.

महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्यात यश आले. त्यानंतर अनेकदा पाण्यासाठी विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन केले. सभागृहात २८ तारांकित प्रश्न उपस्थित केले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबधित विभागाचे मंत्री यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरू ठेवला. या कामामुळेच गेल्या तीन चार वर्षात म्हैसाळ योजना गतीने कार्यन्वित झाली.

मूळ योजनेतून अधिकच्या विसर्गाने पाणी जनतेत पोहोचले. यंदा तर उमदी, डफळापूर, खोजनवाडी, माडग्याळ, बिळूर, देवनाळ, अंतराळ, एकुंडी यासह जिथवर शक्य आहे, तिथे पाणी पोहोच केले. अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रवाहातून छोटे मोठे तलाव भरून घेण्यात यश आले आहे. त्याचबरोबर जत तालुक्याचे त्रिभाजन करून संख व उमदी या दोन नव्या तालुक्यांची मागणी केली. महसुल, शिक्षण, आरोग्य, रिक्त जागांचे प्रश्न राज्याच्या सभागृहाच्या पटलावर आणले. शासनाच्या विविध योजनांतून जत तालुक्यातील गावोगावी आमदार निधी व्यतिरिक्त अधिकचा निधी आणण्यात यश आले आहे.

जत शहराची पाणी योजना असो की शहरात आलेला निधी या सगळ्या कामांसाठी पाठपुरावा केल्याने आज जतकरांना दिलेली बहुतांशी अश्वासने पूर्णत्वाकडे जात आहेत. नुकतेच रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. २९ गावांची स्वतंत्र जलजीवन योजनेचा प्रश्नही लवकरच सुटेल.

कर्नाटकला देण्यात येणारा प्रस्ताव तयार

अधिवेशनात आपण सतत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतून जतला पाणी देण्यासाठी राज्य सरकार प्रत्र व्यवहार करेल असे सांगितले होते. त्यानुसार कृष्णा खोरे पुणे यांनी सविस्तर अहवाल आणि प्रस्ताव तयार केला आहे. यावर शुक्रवारी मुंबईत बैठक होईल, त्यानंतर कर्नाटकडे तातडीने हा प्रस्ताव देवून जत पूर्व भागात विस्तारीत योजना होईपर्यंत आपले शिल्लक पाणी या भागात आणणार आहोत.

हा प्रस्ताव जाताच पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांचीही भेट घेणार आहोत, असेही आ. सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी बाजार समितीचे सभापती सरदार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, निलेश बामणे, सलीम पाच्छापुरे आदी उपस्थित होते.

विस्तारीत योजनेची बैठक

वंचित गावांना राबवण्यात येणाऱ्या विस्तारीत योजनेची नुकतीच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मिरजपासून ते जतच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या जागेची पाहणी केली. या योजनेचे डिझाईन, त्याचे नियोजन, अडचणी, काही भाग राहतो का? कुठे बदल करावा लागेल, अतिरिक्त तलाव, सिमेंट बंधारे, केटीवेअर, पाझर तलाव भरण्यासंदर्भातच्या उपाययोजना असा सगळा मास्टर प्लॅन तयार करून त्यावर फोकस ठेवून काम करत आहोत. ही योजना जितक्या गतीने होईल याकडे सतत जलसंपदा, जलसंधारणसह सातही विभागांचा आढावा घेण्यात आला आहे. शिवाय येत्या पाच जानेवारीला जत येथे विस्तारीत योजनेची विशेष बैठकही लावण्यात आली आहे.

टीका नाही, कामाला महत्व देतो

माडग्याळच्या पाण्यावरून उठलेल्या श्रेयवादावर आ. सावंत यांनी उत्तर दिले. आपण पहिल्यापासून कामाला महत्व देणारे आहोत. जतची जनता सुज्ञ आहे. पाणी कुणी आणले, कोणी पाठपुरावा केला., हे सारे जनतेला माहित आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे लोक स्टंट करतात. गेली ११ वर्षे ते सत्तेत होते, त्यावेळी काही जमले नाही. आता माझ्याच कोंबड्याने उजाडले म्हणणाऱ्यांना काय बोलावे? असे म्हणत विरोधकांवर आ. सावंत यांनी टीका केली.

Back to top button