विटा : पुढारी वृत्तसेवा – राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांची निवड झाली आहे. यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या –
याबाबत सुहास बाबर म्हणाले, खानापूर मतदारसंघातील तलावांचे सुशोभीकरण व्हावे जेणेकरुन हे तलाव जिल्ह्याच्या एकूणच सौंदर्यात भर टाकतील शिवाय एक प्रकारे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल. यादृष्टीने आमदार अनिल बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते. याचाच परिणाम म्हणून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांना हा निधी मिळणार आहे.
या तिन्ही तलावांचे किनारा सौंदर्यीकरण, हरित पट्टा, संरक्षक भिंत, हायमास्ट पोल, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे इ. अशा पद्धतीने कामे करण्यात येणार आहेत. राज्यातील तलाव-सरोवरे आणि मोठे जलाशय पर्यावरणदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने सन २००६ – ०७ या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे.
यामध्ये तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे, तलावात साचलेला आवश्यक घातक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, तलावातील अनावश्यक आणि उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे, तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे, यासह किनारा सौंदर्य सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, तलावाला कुंपण तयार करणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार आहे.
या योजेतंर्गत लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी कार्यक्रम आणि प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उपाय योजना करण्यात येईल. आमदार अनिल बाबर हे विटा (ढवळेश्वर), आटपाडी तलाव व पारे दरगोबा तलाव सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्नशील होते. आमदार बाबर यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निधी मिळावा म्हणून याबाबत प्रयत्न केले होते. त्यानुसार ढवळेश्वर तलावासाठी सुमारे २ कोटी ८८ लाख, तर पारे येथील दरगोबा तलावासाठी ३ कोटी ७१ लाख आणि आटपाडी तलावासाठी सुमारे २ कोटी ८५ लाख रुपये निधी मिळणार आहे.
आपल्या मतदारसंघातील या तिन्ही सुशोभीकरण झाल्यास पर्यटनाच्यादृष्टीने त्यांचा चांगला विकास होईल. विटा पालिकेच्या निवडणुकीवेळी आपण ढवळेश्वर तलावाचे सुशोभीकरण करण्याचा शब्द दिला होता. आमदार बाबर यांनी तो शब्द पूर्ण केला. टेंभूचे पाणी यापूर्वीच आले आहे, त्या पाण्याने हे तलाव आता भरले जात आहेत. त्याचा विकासाचा पुढचा टप्पा म्हणून त्याचे सुशोभीकरण करून तलावांच्या सौंदर्यात भर टाकण्याचा आपला प्रयत्न केला असल्याचेही बाबर यांनी सांगितले.