सांगली : सोयाबीनचे उत्पादन कमी, तरीही दरात घट | पुढारी

सांगली : सोयाबीनचे उत्पादन कमी, तरीही दरात घट

शशिकांत शिंदे

सांगली : यंदा उशिरा आलेला व अपुरा पडलेला पाऊस याचा सोयाबीन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती, मात्र सोयाबीनची आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात आयात सुरू असल्याने दर कमी झाले. त्यामुळे उत्पादन खर्च वाढूनही कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांत नाराजी आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने खाद्यतेलाचे दर वाढू नयेत यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक सुरू असल्याची चर्चा आहे.

वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने रब्बीचा पेरा वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे धास्तावलेले शेतकरी पीक वाचवण्यासाठी औषधांची फवारणी करत आहेत. अशातच मोठ्या कष्टाने हाता-तोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या दरात होणार्‍या घसरणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि अचानक ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका शेतीमालाला बसतो आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम निसर्गासह बाजार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनमधून शेतकर्‍यांच्या हाती फारसे काही आले नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. उत्पादनात घट झाल्याने मागणीत वाढ होऊन दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून बहुतांश बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात घट होत असल्याचे चित्र आहे. मधल्या काळात सोयाबीनला प्रतिक्विंटल 5 हजार ते 5 हजार 200 रुपये दर मिळाला होता. त्यानंतर भाव वाढण्याची आशा शेतकर्‍यांना होती. पण गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर स्थिरावले आणि आता दरात अचानक घसरण झाली आहे.

देशभरात सर्वसाधारण वर्षाला 90 ते 100 लाख टन सोयाबीनची गरज आहे. गेल्यावर्षीचेच वीस ते पंचवीस लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. त्यातच केंद्र सरकारने सोयाबीन आयातीला परवानगी दिली आहे. मार्चपर्यंत पाच ते सहा लाख टन सोयाबीन आवक होणार आहे. आगामी निवडणुकीत खाद्यतेलाचे दर जास्त होऊ नयेत यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याऐवजी आवक सुरू आहे. त्यामुळे दर कमी झाल्याचे बोलले जाते.

सांगली बाजार समितीत सोयाबीन आवक घटली

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्वी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक होत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्यामध्ये घट होत आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन सोयाबीनची आवक होती, यंदा ती केवळ तीस हजार क्विंटल आहे. अनेक व्यापारी मिलमध्ये थेट सोयाबीन पाठवत आहेत.

Back to top button