सांगली : विट्याच्या हत्तीला गुजरातला नेण्यामागे खरं कारण काय? वन्यजीवरक्षक संस्थेची खुलासा करण्याची मागणी | पुढारी

सांगली : विट्याच्या हत्तीला गुजरातला नेण्यामागे खरं कारण काय? वन्यजीवरक्षक संस्थेची खुलासा करण्याची मागणी

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्याचा हत्ती गुजरातला उपचारासाठी नेण्यात आला आहे. हा हत्ती खरंच उपचारासाठी नेण्यात आला की, विक्रीसाठी नेण्यात आला आहे? याचा तात्काळ खुलासा करा, अशी मागणी वन्यजीवरक्षक संस्थेकडून करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात (३ नोव्हेंबर) येथील उत्सव समितीच्या व्याधीग्रस्त हत्तीला उपचारासाठी जामनगर (गुजरात) येथे पाठविण्यात आले. त्या प्राण्याच्या जीवाची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असे सांगत हा विषय भावनिक न करता सर्वांनी साथ द्या असे आवाहन येथील श्रीनाथाष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विटेकरांना सांगितले होते. मात्र आता या निर्णयाबद्दलच वन्यजीवरक्षक संस्थेचे विवेक भिंगारदेवे यांनी शंका व्यक्त केली आहे. याबाबत येथील पत्रकारांसमोर त्यांनी पाठविण्यात आलेल्या हत्ती संदर्भात यात्रा उत्सव समितीला प्रश्न विचारले आहेत.

हत्ती जखमी आणि व्याधीग्रस्त कोणामुळे?

भिंगारदेवे म्हणाले, हत्ती उपचारासाठी शासनाने सक्तीने पाठवण्यास भाग पाडले? म्हणून पाठविले आहे का विकले आहे. कारण त्याच्या हस्तिदंताचा विषय आहे. कारण विट्याचे वैभव असणारा हत्ती उपचारासाठी एका सामाजिक संस्थेला का देण्यात आला? मुळात हा हत्ती जखमी आणि व्याधी ग्रस्त का आणि कोणामुळे झाला? याची चौकशी झाली पाहिजे. उत्सव समितीच्या म्हणण्यानुसार या हत्तीला इथले लोक मसाले पान, गरम चपाती वगैरे प्रकारचे तयार अन्न देत होते, परंतु असे खाद्य त्या प्राण्याला चालत नसते इतकी साधी माहिती संबंधित माहूताला नव्हती का? त्यानंतर ज्यावेळी संपूर्ण शरीरा वरती मोठ्या जखमा झाल्या, त्यानंतरही त्या अंगावर कापड टाकून भाड्याने यात्रेकरिता किंवा अन्य कार्यक्रमांसाठी का दिला जात होता? मुळात चुकीच्या पद्धतीने हत्तीचे पालन पोषण करून त्याला व्याधीग्रस्त अवस्थेत नेणाऱ्या माहुतावर काय शासन देणार? हत्ती हा कोणताही संवेदनशील विषय नसून हा यात्रा समितीचा फक्त पैसे कमवण्याचा मार्ग होता हेच यातून दिसते असा आरोप करत आतासुद्धा व्याधीग्रस्त हत्ती गुजरातला उपचारासाठी नेलाय का विकलाय ? याचा तात्काळ खुलासा विट्याच्या यात्रा उत्सव समितीने करावा अशी मागणीही भिंगारदेवे यांनी केली आहे.

Back to top button