एकनाथ शिंदे केवळ ४० आमदारांचे मुख्यमंत्री आहेत काय? : वैभव पाटील | पुढारी

एकनाथ शिंदे केवळ ४० आमदारांचे मुख्यमंत्री आहेत काय? : वैभव पाटील

विटा : पुढारी वृत्तसेवा : आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावल्यावर पाणी सोडले जाते, मुख्यमंत्री शिंदे फक्त ४० आमदारांचे मुख्यमंत्री आहेत काय? असा सवाल राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे.

कोयनेच्या पाण्याच्या प्रश्नावरून आमदार अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील यांच्यात सध्या सुरू असलेल्या वाकयु द्धात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षाची भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले की, कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्या पद्धतीने पाणी सोडण्यासाठी भूमिका घेतली, ती योग्य नव्हती. अशावेळी खासदार संजय पाटील यांनी प्रसंगी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यावर आमदार अनिल बाबर यांनी लगेच टीका करण्याची गरज नव्हती. जिल्ह्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना पाण्यासाठी एवढं राजकारणच घडू नये, अशी आपली भूमिका आहे.

वास्तविक पाहता कुठल्या जिल्ह्याला किती पाणी द्यायचं, कुठल्या टप्यात द्यायचं, याची रूपरेषा ठरलेली असते. हे सगळं ठरलेलं असताना, कुणाला तरी वाटतयं म्हणून आणि काहीतरी वेगळे करतोय हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक जर पाण्याचे राजकारण करत असतील, तर ते बरोबर नाही. सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. नामदार देसाई हे ज्येष्ठ मंत्री आहेत. पण मागच्या आठ दिवसांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका पाहता, ते ठरवून काम करतात की काय? अशी शंका येते, असा टोला पाटील यांनी लगावला.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यासाठी ३५ टीएमसी पेक्षा जास्त पाणी कोयना धरणामध्ये राखीव आहे. त्यातून पाणी टप्याटप्प्याने सोडायचे वेळापत्रक ठरले आहे. अशावेळी पाणी सोडण्यासाठी आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय, आपण म्हटलं तरच पाणी सोडलं जाते, अशी भूमिका चुकीची आहे. आता फक्त दोन टीएमसी पाणी सोडलयं. मग उर्वरीत कालावधीत प्रत्येकवेळी तुम्ही फोन करणार आणि मग पाणी सोडले जाणार का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

पाण्याच्या विषयात राजकारण न करता जिल्ह्यातील जनतेला दुष्काळच्या वेदना होऊ नयेत. यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज आहे. आम्ही देखील प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button