कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम गतीने करा : धैर्यशील माने | पुढारी

कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम गतीने करा : धैर्यशील माने

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-सांगली रस्त्याची कामे गतीने करा, भूसंपादनाच्या मोबदल्यात भरपाई देताना शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी दूर करा, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करा, अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गावातील नागरिकांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. खा. धैर्यशील माने यांनी लोकांच्या द़ृष्टीने हा सुरक्षित मार्ग तयार करावा. त्यादुष्टीने लोकांच्या सूचनेप्रमाणे त्यात योग्य ते बदल करा, अशी मागणीदेखील या बैठकीत केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ज्या शेतकर्‍यांची भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्यांनी तत्काळ पैसे स्वीकारावेत. किमतीविषयी काही आक्षेप असतील तर आहे ती रक्कम स्वीकारून उर्वरित अपेक्षित रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा. सर्व बाबींची खात्री करून त्यावर निर्णय घेता येतील. अधिकार्‍यांनीदेखील पाहणी, नोंदी, डिमार्केशन याबाबत काटेकोरपणे कामे करावीत.

खा. धैर्यशील माने म्हणाले, रस्त्याची कामे करताना शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दखल घ्या. त्यांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करा. अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पी. डी. पंदारकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Back to top button