कोल्हापूरचा ऊस दर पॅटर्न सांगलीत राबवा : राजू शेट्टी | पुढारी

कोल्हापूरचा ऊस दर पॅटर्न सांगलीत राबवा : राजू शेट्टी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या हंगामात ज्यांनी 3 हजार रुपयांपेक्षा कमी एफ आरपी दिली आहे त्यांनी शंभर रुपये, तर ज्यांनी 3 हजारांवर एफ आरपी दिली आहे, त्यांनी 50 रुपये प्रतिटन द्यावेत. तसेच चालू हंगामासाठी प्रतिटनास एफआरपी अधिक 100 रुपये हा कोल्हापूरमधील पॅटर्न जिल्ह्यातील कारखानदारांनी मान्य करावा. यासाठी दोन दिवसांची मुदत देतो. त्यामध्ये तोडगा काढा. अन्यथा जिल्ह्यात एकही ऊस वाहतुकीचे वाहन फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, ऊस दरासाठी इतिहासात पहिल्यांदा 38 दिवस आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे.

कोल्हापूरचे शेतकरी पैरा फेडतील

ऊस दरासाठी कोल्हापूरच्या शिरोली नाका येथे गुरुवारी महामार्ग रोखण्यात आला होता. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे सांगलीत ऊस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ आलीच, तर त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूरचे शेतकरी पैरा फेडतील

राजारामबापू कारखान्यावरील आंदोलन स्थगित

शेट्टी म्हणाले, राजारामबापू पाटील कारखान्यावर शनिवारी स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन होणार होते. मात्र कडेगाव येथे रविवारी होणार्‍या बैठकीत तोडगा निघेल, त्यामुळे आंदोलन करू नका, अशी विनंती कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी केली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाची सुरुवात याच कारखान्यावरून होईल. त्यानंतर क्रांती, सोनहिरा कारखान्यांवर आंदोलन होईल. कोणी कितीही मोठा नेता असता तरी आंदोलन करणारच.

…तर ऊस कोल्हापूरला पाठवा

सांगलीतील कारखान्यांना कोल्हापूरचा पॅटर्न मान्य करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. कडेगावमध्ये होणार्‍या बैठकीत हा निर्णय मान्य केला नाही, तर तीव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपयर्र्ंत ऊस कोल्हापूरच्या कारखान्यांना पाठवावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला. यावेळी संदीप राजोबा, महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, संजय बेले उपस्थित होते.

पहिली उचल एकरकमीच, त्यामध्ये तडजोड नाही

शेट्टी म्हणाले, यंदा उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होणार आहे. त्यामुळे पहिल्या हप्त्यासाठी फ ारसा आग्रही राहिलो नाही. भविष्यात इथेनॉलचे दर वाढणार आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीनंतर साखरेलाही चांगला भाव येणार आहे. त्यामुळे दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्यासाठी आग्रह राहणार आहे. तसेच पहिली उचल विनाकपात एकरकमी घेऊ. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही.

लुंग्या -सुंग्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही

कोल्हापूरचे आंदोलन मागे घेतल्यानंंतर कारखानदारांबरोबर संगनमत झाल्याचा आरोप काहीजण करीत आहेत, याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, वीस वर्षांपासून माझ्यावर हा आरोप होत आहे. माझ्या एका हाकेने पंधरा ते वीस हजार शेतकरी महामार्ग रोखण्यासाठी आले होते. माझ्या कामाची हीच पावती आहे. त्यामुळे कोण्या लुंग्या-सुंग्याच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, असा टोला नाव न घेता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला. तसेच माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री डीपीसीचा फंड वाटपासाठी असतात का ?

जिल्ह्यात ऊस हेच मुख्य पीक आहे. तसेच कारखान्यांतून येणारे उत्पन्न हे उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र जिल्ह्यात ऊस दराचा गंभीर प्रश्न असताना पालकमंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यांना यातील माहिती नसेल तर पालकमंत्री या नात्याने त्यांनी अभ्यास करावा. तोडगा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. पालकमंत्री म्हणजे नुसते डीपीसीचा फंड वाटण्यासाठी असतात का, असा टोला नाव न घेता सुरेश खाडे यांना लगावला.

Back to top button