सांगली : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा संकटात

गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
तासगावसह जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यातून येणार्या उत्पन्नावर या भागातील शेतकर्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या अनेक भागात फळ तयार होण्याच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागा आहेत.तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागात तर बागांवर रोग पडला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ नये यासाठी शेतकर्यांची सकाळपासून द्राक्षावर फवारणी करण्यासाठी खटपट सुरू आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले तर डाऊनीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.द्राक्षबागांत सातत्याने कीटकनाशकांची फवारणी करावी लागते आहे. परिणामी उतपादन खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित
कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदाच्या वर्षी तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्तहोत आहे.