Gold Cheating Case In Jath : जतमध्ये सोने खरेदी फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ; आणखी एका महिलेची ९ लाखांची फसवणूक | पुढारी

Gold Cheating Case In Jath : जतमध्ये सोने खरेदी फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ; आणखी एका महिलेची ९ लाखांची फसवणूक

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथे स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणूक केलेले रॅकेट मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशमधील व्यापाऱ्याच्या फसवणूक प्रकरणानंतर आणखी एका महिलेची सोने खरेदीमध्ये फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे. तालुक्यात यापूर्वी साडेसव्वीस लाखाच्या सोने फसवणूक प्रकरणानंतर रेवनाळ येथे हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पद्मिनी पांडुरंग गावडे (रा. रेवनाळ) यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रेवनाळ येथील पद्मिनी पांडुरंग गावडे या महिलेने फसवणूक झालेल्या महिलेने स्वस्तात सोने देतो म्हणून मेहबूब शेख व दर्याप्पा यलापा हवीनाळ या दोघांनी ९ लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. स्वस्तात सोने देतो म्हणून पैसेही घेतले परंतु सोने व पैसे परत दिले नाहीत. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर गावडे यांनी मेहबूब रमजान शेख, (रा. एमआयडीसी जत), दर्याप्पा यल्लाप्पा हवीनाळ (रा. विठ्ठल नगर, जत) या दोघांच्या विरोधा जत पोलिसात तक्रार दिली. यापूर्वीच्या साडेसव्वीस लाखांच्या सोने फसवणूक प्रकरणात सध्या हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. जत तालुक्यातील सोने फसवणूक प्रकरणात दाखल झालेल्या या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे करीत आहेत.

यापूर्वी साडेसव्वीस लाखांच्या सोने फसवणूकीने तालुक्यात खळबळ

२ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील एका व्यापाऱ्यास जत येथील पाच जणांनी स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. याच प्रकरणात पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तिघे पोलीस कर्मचारी निलंबित केले आहेत. दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुनिल साळुंखे यांनी अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते.

हेही वाचा

Back to top button