दिघंची परिसरात अवकाळी पावसाचे थैमान; द्राक्ष बागांचे लाखांचे नुकसान | पुढारी

दिघंची परिसरात अवकाळी पावसाचे थैमान; द्राक्ष बागांचे लाखांचे नुकसान

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : दिघंची ( ता. आटपाडी ) येथील तरटी मळा परिसरातील द्राक्ष बागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तरटी मळ्यातील रमेश अण्णा निंबाळकर आणि अन्य शेतकऱ्यांच्या बाजारपेठेत जाण्यासाठी तयार मालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

संबंधित बातम्या 

दिघंची येथील तरटी मळ्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेची लागवड केली आहे. रमेश निंबाळकर यांनी दीड एकरात द्राक्ष बाग अतिशय काळजीपूर्वक जोपासली होती. या बागेची जोपासना करण्यासाठी विविध प्रकारची फवारणी आणि औषधा मिळून असा ७ लाख रुपयांचा खर्च केला होता. द्राक्षाचे पीक चांगले आल्याने किमान ३० ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते.

बुधवारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परंतु, आज गुरूवारी दुपारी या परिसरात सोसाट्याच्या वारा आणि जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे द्राक्षाची बाग कोसळली. आणि बागेतील तयार द्राक्षांचे घड जमिनावर पडले. त्यामुळे अंदाजे ३० ते ४० लाखांचे नुकसान झाले.

तरटी मळ्यातील नाथाजी किसन काटकर, जगन्नाथ तुकाराम काटकर, सुरेश मुरलीधर महाडिक, शिवाजी शामराव निंबाळकर या शेतकऱ्यांच्या बागा देखील तयार झाल्या होत्या. या बागांचे देखील मोठा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला गेला. आता झालेला खर्च कसा भरून काढायचा? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या बागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Back to top button