Sangli News : सावळजमध्ये अवैधपणे दारुची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

Sangli News : सावळजमध्ये अवैधपणे दारुची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

विटा : पुढारी वृत्तसेवा :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विट्यातील पथकाने केलेल्या कारवाईत तासगाव तालुक्यातील तिघांना   अटक केली. त्यांच्याकडून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा चार लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला. विनोद विठ्ठल माने, (वय ३७ रा. माने वस्ती, येळावी), सुशांत अशोक गायकवाड (वय २७, रा.गायकवाड मळा, बस्त वडे) आणि गणेश मालोजी शिंदे, वय २४,रा. दहिवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. Sangli News

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथे डोंगरसोनी रस्त्यालगत एका हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये भूमिगत पाण्याच्या टाकीत बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपविल्या आहेत. शिवाय तेथे गोवा बनावटीची दारू विदेशी दारूच्या बाटल्यांत भरून विक्री होत आहे, अशी माहिती सांगलीचे उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि निरीक्षक विजय मनाळे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री निरीक्षक विजय मनाळे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरचे निरीक्षक प्रशांत रासकर, तासगावचे दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, विट्याच्या दुय्यम निरीक्षक  माधवी गडदरे, दिलीप सानप, उदय पुजारी, जवान सचिन सावंत, प्रमोद सुतार, रणधीर पाटील, अमित पाटील, वाहनचालक अर्जुन कोरवी यांच्या पथकाने सावळज येथे जाऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. Sangli News

यावेळी विनोद माने सुशांत गायकवाड आणि गणेश शिंदे हे तिघेजण बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विदेशी बाटल्यांमध्ये घालून बुच पॅक करत असताना रंगेहात सापडले. या तिघांनाही राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या १८० मि.ली. च्या ८९४ बाटल्या, ७५० मि.ली.च्या १५०, बॉटलिंग उपकरण, २० हजार १९१ बॉटलची बनावट बुचे, ७२ रिकाम्या बाटल्या, २ स्टीलचे जग, २ प्लास्टिक कँन, ३ प्लास्टील गाळणी, डी व्ही आर २ मोबाईल असा एकूण ४ लाख २४ हजार ८१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button