Anil Babar : सिंचनासाठी कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार : आमदार बाबर | पुढारी

Anil Babar : सिंचनासाठी कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार : आमदार बाबर

विटा: पुढारी वृत्तसेवा : सिंचना करिता खास बाब म्हणून तातडीने कृष्णा नदीत पाणी सोडा, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने विशेष बैठकीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी दिली आहे.

मौजे बामणी (पारे) ता. खानापूर, जि. सांगली) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या ११व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आणि गाळप क्षमता विस्तारीकरणाचे उद्घाटन आमदार बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विश्वजित कदम, कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम उपस्थित होते. तर माजी आमदार मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. (Anil Babar)

यावेळी आमदार बाबर म्हणाले की, उदगिरी कारखान्याने अल्पावधीत गाळप आणि इथेनॉल क्षमता वाढविली. विविध उपक्रम राबवून कारखान्याचा नावलौकिक वाढविला आहे. कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांचे कौतुक केले. कारखाना परिसरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. विटा ते पारे या रस्त्याचे सध्या ७ मीटरचे काम चालू आहे. मात्र, पुढच्या वर्षी तो १० मीटर्सने करण्यात येईल, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, टेंभूचे पाणी वाढीव क्षेत्रासाठी मिळण्यासाठी आमदार बाबर यांनी विशेष प्रयत्न केले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी तातडीने सोडणे आवश्यक आहे. यासाठी आमदारांच्या बरोबर राहून टेंभूचे पाणी शेतीसाठी वेळेत मिळण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

डॉ. राहुल कदम म्हणाले, कारखान्याने हाती घेतलेले दैनंदिन ५ हजार २०० मेट्रीक टन ऊस गाळप आणि ५५ हजार लिटर्स क्षमतेवरुन १ लाख ७५ हजार लिटर्स इथेनॉल क्षमता वाढविली. केवळ ७ महिन्यात हे काम केल्याचा आनंद आहे. असल्याचे सांगत कारखान्याने प्रदूषण कमी करण्यासाठी आरपीसी, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सीपीयु आणि स्पेन्टवॉश पासून खत करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी बसवल्याचे सांगितले.

वजन काटा आणि वाहन पूजन डॉ. शिवाजी राव कदम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्यास सातत्याने जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ६० शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक उत्तम पाटील यांनी स्वागत केले. प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले.

यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशोक साबळे, मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के. बापू जाधव, खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र देशमुख, सुरेश पाटील, जयहिंदशेठ साळूंखे, डी. ए. माने, डॉ. हणमंतराव कदम, विजय कदम, अॅड. सुशांत कदम, निवृत्तीराव जगदाळे, सयाजी धनवडे, आबासाहेब चव्हाण, बाळकृ ष्ण यादव, दौलतराव यादव, आर. एम. पाटील, आनंदा शेळके, अभिजित शिंदे, भरत लेंगरे, महावीर शिंदे, शरद शहा यांच्यासह कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button