

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिवसेना पदाधिका-यांवर काळाने घाला घातला. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर चारचाकी वाहनाला (एम. एच. १० ए. जी – ४३२०) पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुध वाहतूक करणा-या टॅकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीतील उड्डाणपूलावर झाला.
या अपघातात विवेक सुरेश तेली (वय ३९) रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ हे ठार झाले आहेत. तर शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप सुभाष शिंत्रे (वय ४२) रा. हिंगणगांव ता. कवठेमहांकाळ, प्रसाद मार्तंड सुर्यवंशी (वय ४२) रा. बोरगांव ता कवठेमहांकाळ हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष लिंगाप्पा कुनुरे (वय ६० रा. हिंगणगांव ता. कवठेमहांकाळ) आणि चालक महेश शिवाजी सुर्यवंशी (वय ३०) रा. कवठेमहांकाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सुत्रे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील मेळाव्यासाठी हिंगणगांव व कवठेमहांकाळ येथील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तवेरा गाडीने चालले होते. शिरढोण येथील जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलच्या समोर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलावर पंढरपूरहून मिरजेकडे जात असलेल्या दूध वाहतूक करणा-या टॅकरने पाठीमागून जोराने धडक दिली. तवेरा गाडी सुमारे वीस पंचवीस फूट फरफटत जावून उड्डाणपूलाच्या कठड्यावर आदळली.
या अपघातातील पाच जखमीना पहाटे पाच वाजता कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार केलेनंतर सर्वच जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु होण्यापुर्वी विवेक तेली यांचा मृत्यू झाला.