पुणे; पुढारी वृत्तसेवा : ST Strike Pune : राज्यभरात असलेल्या एसटीच्या 250 डेपोंमधून तब्बल 25 हजार खासगी गाड्या बुधवारी सुटल्या. तर पुणे विभागातील एसटीच्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरीतील वल्लभनगर स्थानकांमधून 210 खासगी गाड्या धावल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवासाकरिता प्रवाशांची होणारी ससेहेलपाट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलनामुळे गेले तीन दिवसांपासून प्रवाशांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधूनच खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या गाड्या एसटीच्याच भाडे दरात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन पिंपरीतील वल्लभनगर स्थानकातून खासगी गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच शासनाने एसटी स्थानकांतूनच ट्रॅव्हल्स चालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्यामुळे एसटी कर्मचारी नाराज झाले.
(ST Strike Pune) एसटी स्थानकांतून सोडण्यात येणार्या खासगी बसचे भाडे दर एसटीच्या भाडे दरा इतकेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची येथे दिवसभर प्रवाशांची गर्दी होत होती. मात्र, खासगीचे भाडे दर आणि लालपरीच्या भाडे दरात काही प्रमाणात तफावत आढळल्याने प्रवासी आणि ट्रॅव्हल्स चालकांमध्ये सकाळच्या सुमारास वादावादी झाली.
दरम्यान, शासनाने आमचा संप मोडून काढण्यासाठी प्रवाशांच्या सोयीच्या नावाखाली खासगी गाड्या एसटी स्थानकांमध्ये घुसविल्या असल्याचा एसटी कर्मचार्यांनी आरोप केला.
राज्यातील एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूकीसाठी खासगी वाहतूकदारांनी 25 हजार खासगी बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. मात्र, या एसटी स्थानकातून सुटणार्या खासगी बस गाड्यांव्यतिरिक्त सुध्दा नियमित मार्गांवर राज्यभरात 10 हजार ऑल इंडीया परमिट असलेल्या खासगी गाड्यांनी सुध्दा प्रवाशांना सेवा पुरविली.
– स्वारगेट एसटी स्थानक – 52 खासगी बस धावल्या
– शिवाजीनगर(वा.) – 33 खासगी बस धावल्या
– पुणे स्टेशन – 45 खासगी बस धावल्या
– पिंपरी-वल्लभनगर – 80 खासगी बस धावल्या
– पुण्यात एसटी स्थानकातून सुटलेल्या एकूण गाड्या – 210 खासगी बस
राज्यभरातील एसटी स्थानकांमध्ये प्रवाशांना आम्ही तब्बल 25 हजार बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याद्वारे प्रवाशांना सेवा पुरविली जात आहे. याव्यतिरिक्त 10 हजार ऑल इंडीया परमिट बस सुरू आहेत. आमचा एसटी चालकांच्या संपाला पाठींबा आहे. राज्यसरकारने तातडीने एसटी कर्मचार्यांचा प्रश्न सोडवावा.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना