पैलवान जत्रेशिवाय बाहेर पण येत नाही, विशाल पाटील यांची खा. संजय पाटील यांच्यावर टीका | पुढारी

पैलवान जत्रेशिवाय बाहेर पण येत नाही, विशाल पाटील यांची खा. संजय पाटील यांच्यावर टीका

तासगाव (सांगली) : पुढारी वृत्तसेवा- पाऊस नसल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला तरीही खासदार घराबाहेर पडले नाहीत. सहा महिन्यावर निवडणूक आली म्हटल्यावर सगळीकडे फिरणार. ते म्हणतात की, जत्रेचा पैलवान नाही, पण पैलवान जत्रा आल्याशिवाय बाहेर पण पडत नाही. अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर केली आहे. तालुक्यातील कवठेएकंद येथे जनसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील बोलत होते.

संबंधित बातम्या – 

तसेच या जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकट करायची तर तासगाव – कवठेमहांकाळ या मतदारसंघाला वगळून करताच येणार नाही. यापुढे या मतदारसंघामध्ये लागेल ती ताकद देऊ. येत्या निवडणुकीत मतदारसंघ मलाच मताधिक्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील म्हणाले, निवडणूक झाली की साडेचार वर्षे खासदार फक्त लोकांच्या मालमत्ता बळकवायचे काम करत असतात. त्यांनी तासगावचा कारखाना खरेदी करुन खासगी केला. खानापूर तालुक्यातही असाच एक कारखाना घेऊन खासगी केला. तिप्पट किमतीला विकून टाकला. पण सभासदांच्या पैशाचं काय झालं, ते कुठं गेले?

दादा आणि कदम घराणे एक झालेले आहे. आता संघर्षामध्ये ताकद वाया जाऊ देणार नाही. जनसंवाद यात्रेमुळे या जिल्ह्यात काँग्रेस बळकट होणार आहे. परंतू वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम घराण्याचे वंशंज राज्यामध्ये सांगली जिल्हा एक नंबर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.

यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, महिला काँग्रेसच्या प्रदेशा उपाध्यक्षा शैलजा पाटील, डॉ. विवेक गुरव, जितेश कदम, महादेव पाटील, अमित पाटील, राजीव मोरे, विशाल चांदूरकर, महेश पाटील, विशाल शिंदे, कुमार माळी, रामभाऊ थोरात, डॉ. नरेंद्र खाडे यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बाप पोराला आपला म्हणायच बंद करतो

विशाल पाटील म्हणाले, दोन निवडणुकीत तुम्ही आपला खासदार म्हणून मतदान केलं. परंतू त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही. जर पोरगा बाद निघाला आणि रोज मारायला लागला तर बापसुध्दा पोराला आपला म्हणायचं बंद करतो. तुम्ही अजूनही त्यांना आपला का म्हणता, हे कोडं मला सुटलेलं नाही. आमदार पण आपला आणि खासदार पण आपलाच म्हणायला हरकत नाही, पण आपलं कुणाला म्हणायचं ते समजून घ्या. किमान तुम्हाला अडचणीत टाकून तुमच्या खिशातलं काढून नेणार नाही त्याला तर आपलं म्हणा.

 

Back to top button