महाराष्ट्रातही सरकारच्या आशीर्वादाने मंत्रालयात कमिशन खोरी सुरू; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप | पुढारी

महाराष्ट्रातही सरकारच्या आशीर्वादाने मंत्रालयात कमिशन खोरी सुरू; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

विटा : पुढारी वृत्तसेवा, कर्नाटकातील पूर्वीच्या भाजप सरकार प्रमाणेच महाराष्ट्रातही सध्या मंत्रालयात सगळीकडे कमिशन खोरी सुरू आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विट्यात काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंवाद पदयात्रेनंतरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील, डॉ. जितेश कदम, पृथ्वीराज पाटील, अशोकराव गायकवाड, रविंद्र अण्णा देशमुख, तालुका अध्यक्ष सुहास नाना शिंदे, विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. (Prithviraj Chavan)

केवळ जाहीरातबाजी करण्यात मग्न

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी हे केवळ जाहीरातबाजी करण्यात मग्न आहेत. आपला चेहरा दिसला नाही तर लोक आपल्याला विसरतील अशी भिती त्यांना वाटत असावी. तुम्ही घोषणा दिल्या, जाहिराती केल्या पण वस्तुस्थिती वाईट आहे. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशावर प्रचंड कर्ज वाढले आहे. पंतप्रधानांना अर्थव्यवस्था नीट सांभाळता आली नाही. मागच्या निवडणूकीत केवळ विरोधकांची विभागणी झाली म्हणूनच मोदी सरकार सत्तेत आले. सरकार विरोधी मतांची बेरीज अधिक होती. म्हणूनच आम्ही यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित आघाडी केली आहे. त्याची धडकी मोदींना बसली आहे. (Prithviraj Chavan)

सरकार आहे पाकीटमार 

राज्याच्या सत्तेवर बसलेल्या गद्दार आणि फितूर लोकांचे केवळ कमिशन खोरी आणि टक्केवारी सुरू आहे. भाजप सरकार विरोधी पक्षाच्या लोकांना ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय सारख्या यंत्रणा मागे लावते आहे, पण स्वतःच्या मंत्र्यांकडे ते कानाडोळा करीत आहे, असेही चव्हाण म्हणाले. माजी मंत्री कदम म्हणाले, सध्याचे केंद्र सरकार पाकीटमार आहे. लोकांना फसवत आहे. आपण जागे राहिले पाहिजे. नऊ राज्यातील सरकारे हुकूमशाही पद्धतीने पाडली. हे पाडापाडीचे राजकारण थांबले पाहिजे. हा मतदारसंघ डॉ. पतंगराव कदम आणि आमदार मोहनराव कदम यांना मानणारा मतदारसंघ आहे. मात्र २०१४ ला काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर काही लोकांचे खरे रंग कळले. मात्र यापुढे आपण निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगत खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी जितेश कदम यांना पण पूर्णवेळ मोकळे सोडत आहे, अशी घोषणाही कदम यांनी केली.

विशाल पाटील म्हणाले, अंतर्गत संघर्षाने कॉंग्रेसचे खरे नुकसान झाले आहे. मात्र आम्ही आता एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्रीत काम करून सांगली जिल्हा राज्यात अग्रेसर करू. आमच्यात भांडणे लावून पोळी भाजण्याचे काम खासदारांनी केले आहे. यापुढची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असेही पाटील म्हणाले.

हा मतदारसंघ क्रांती घडवेल : डॉ. जितेश कदम

डॉ. जितेश कदम म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस खानापूरात कमकुवत असल्याचे बोलले जाते. मात्र हा मतदारसंघ क्रांती घडवेल, असा विश्वास आजच्या सभेने निर्माण झाला आहे. गेल्या नऊ वर्षात लोकांना मनस्ताप झाला आहे. हे सरकार कोणासाठी काम करतंय? असा सवालही त्यांनी केला. तर सुहास शिंदे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील ज्यांना काँग्रेसने बळ दिले, त्यांनीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वाटोळे केले अशी मनातली खदखद बोलून दाखवली. यावेळी चंद्रकांत चव्हाण, बलवडीचे शिवाजी पवार, रमेश सावंत, निलम सुर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मनमंदिर उद्योग समुहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, रविंद्रअण्णा देशमुख, नंदकुमार पाटील, विठ्ठलराव साळुंखे, राजू राजे यांचीही भाषणे झाली.

हेही वाचा 

Back to top button