सांगली : तासगावात महाविद्यालयीन तरुणींचा रस्ता रोको; बस मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा | पुढारी

सांगली : तासगावात महाविद्यालयीन तरुणींचा रस्ता रोको; बस मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या तासगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शुक्रवारी (दि.१८) तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्ता रोको केला. तब्बल तासभर विद्यार्थी-विद्यार्थीनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. अखेर तासगाव आगार व्यवस्थापकांनी यापुढे अशी गैरसोय होणार नाही, असे लेखी आश्वासन देण्याची ग्वाही दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कॉलेज दुपारी एक वाजता सुटते. यावेळेस शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनी मणेराजुरी रस्त्यावरील बस थांब्यावर उभे असतात. परंतु, वेळेवरती बसेस येत नाहीत. काही वेळेस रिकाम्या बस येतात आणि निघून जातात. विद्यार्थ्यांनी हात करुनही चालक गाडी थांबवत नाहीत. असा प्रकार शुक्रवारी परत घडला. दोन रिकाम्या बस कवठे महांकाळच्या दिशेने गेल्यानंतर आलेली तासगाव – कवठेमहांकाळ ही तिसरी बस (क्रमांक एम एच ४० एन : ९४०८) विद्यार्थिनींनी रोखली. तेथे उपस्थित ३० ते ४० विद्यार्थ्यांनी बसच्या समोरच रस्त्यावरती बसल्या.

सदर आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करुन तासगाव आगार व्यवस्थापक दयानंद पाटील तसेच वाहतूक निरीक्षक सूर्यकांत खरमाटे आंदोलन स्थळी दाखल झाले. तर सहायक पोलीस निरिक्षक नितीन केरामही दाखल झाले. पण आक्रमक विद्यार्थिनी कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. रोजच अशी गैरसोय होणार असेल तर आम्हाला पास तरी कशासाठी देता, असा सवाल त्यांनी विचारला. आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी यापुढील काळात अशी गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही दिली. पण तोंडी आश्वासन नको, लेखी द्या, असा पवित्रा विद्यार्थीनींनी घेतला. आगार व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन देण्याची ग्वाही देताच आंदोलन थांबविण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button