Kolhapur accident : नृसिंहवाडी-कवठेगुलंद मार्गावरील अपघातात एकजण जागीच ठार | पुढारी

Kolhapur accident : नृसिंहवाडी-कवठेगुलंद मार्गावरील अपघातात एकजण जागीच ठार

कवठेगुलंद; पुढारी वृत्तसेवा : नृसिंहवाडी (ता.शिरोळ) ते कवठेगुलंद मार्गावरील सनराईज पेट्रोल पंपासमोर बुधवारी (दि. ९) रात्री दोन मोटारसायकलीची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामध्ये कवठेगुलंद येथील चंद्रकांत रामचंद्र जांभळे (वयवर्षे ५०) हे जागीच ठार झाले. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला.

नृसिंहवाडी कवठेगुलंद मार्गावर रात्रीच्या सुमारास चंद्रकांत रामचंद्र जांभळे हे आपल्या मोटारसायकलीवरून (क्र. एम एच 09 इडी 1131) कवठेगुलंदकडे जात होते. याच मार्गावरून शेडशाळ येथील नियाज नूर जमादार हा युवक आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून (क्र. एम एच 09 एफ सी 4540) नृसिंहवाडीकडे जात होता. दरम्यान सनराईज पेट्रोल पंप समोर या दोन्ही भरधाव वेगातील मोटारसायकलींची जोराची धडक झाली. या अपघातात चंद्रकांत जांभळे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच ठार झाला. तर नियाज जमादार हे देखील जखमी झाले आहेत.

या अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाली. नंदकुमार जांभळे यांनी नीयाज यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर कुरुंदवाड पोलिसात नियाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. चंद्रकांत हे माळकरी असून त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील लोक, मित्र परिवार यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अनिल चव्हाण करीत आहेत.

Back to top button