सांगली : कडेगांव तालुक्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी | पुढारी

सांगली : कडेगांव तालुक्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी

कडेगांव; पुढारी वृत्तसेवा : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा कडेगाव येथील कार्यक्रम रद्द करावा. व येथून पुढे तालुक्यात कोणताही त्यांचा कार्यक्रम होवू देवू नये, अशी मागणी सर्व राजकीय पुरोगामी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कडेगाव पोलीस ठाण्याला पुरोगामी राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांबद्दल तसेच स्वातंत्र्यदिन, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये संभाजी भिडे यांच्याबद्दल अनेक ठिकाणी निषेध नोंदविण्यात आले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतही चुकीचे वक्तव्य केले आहे. या सर्व घटनांमुळे राज्यात ठीकठिकाणी तीव्र पडसाद उमटले आहेत. याची गंभीर दखल घेवून यापुढे कडेगाव शहरासह तालुक्यात कोणत्याही ठिकाणी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी देण्यात येवू नये, अशा कार्यक्रमास बंदी घालावी. तालुक्यात विना परवाना भिडेंचे कार्यक्रम झाल्यास त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्यास त्या आयोजकास व संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी सर्व पुरोगामी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी महादेव ओवाळ, शिवलिंग सोनवणे, संदीप ठोंबरे, जीवन करकटे, परशुराम माळी, विजय माळी, दत्तात्रय पवार, जितेंद्र सोरटे, आकाश वाघमारे, रुपेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button