राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संतोष जगताप याला ठाण्यातून अटक केली आहे. देशमुखांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या बदल्या आणि पोस्टींगमध्ये जगताप हा मध्यस्थ होता अशी माहिती मिळते. या गुन्ह्यातील ही पहिलीच अटक असून न्यायालयाने जगतापला ०४ नोव्हेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने सुरुवातीला याप्रकरणाशी संबंधीत बहुतेकांकडे कसून चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवले. मात्र मधल्या काळात सीबीआयचा तपास थंडावला होता. त्यानंतर सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे याच्यासह गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड आणि संतोष जगताप यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड हे सीबीआय चौकशीला हजर राहिले. सीबीआयने त्यांची चौकशी करून जबाब नोंदविला आहे. मात्र सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांच्यासह संतोष जगताप हा चौकशीला हजर राहिला नाही. अखेर सीबीआयने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. जगताप हा ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.