Almatti Dam Flow: ‘अलमट्टी’ धरणातून १ लाख क्युसेक्सहून अधिक विसर्ग सुरू; कोल्हापूर, सांगलीला दिलासा | पुढारी

Almatti Dam Flow: 'अलमट्टी' धरणातून १ लाख क्युसेक्सहून अधिक विसर्ग सुरू; कोल्हापूर, सांगलीला दिलासा

विजय लाळे

विटा : कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून अखेरीस आज (दि. २६) सायंकाळी १ लाख १५ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू (Almatti Dam Flow) करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापुराचा धोका तूर्तास टळला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सांगली, सातारा जिल्ह्यातील पूर नियंत्रण राहण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, हे कर्नाटक सरकारला बंधनकारक (Almatti Dam Flow) आहे. मात्र, कर्नाटक सरकार आणि त्यांचे प्रशासन अलमट्टी धरणाबाबत ही तत्वे नेहमीच बाजूला ठेवते असा अनुभव आहे. त्यामुळे सांगली येथील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती मागील तीन वर्षे सातत्याने याबाबत अभ्यास करून कर्नाटक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहे. कृती समितीने गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापुराची परिस्थिती लक्षात घेता अलमट्टी धरण व्यवस्थापनाने एका दिवसांत चार वेळा विसर्ग वाढवला आहे. सकाळी १५ हजार क्युसेक वरून ९ वाजता ३० तीस हजार तर १ वाजता ४२ हजार ६०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. आता दुपारी ४ नंतर तो ७५ हजार क्युसेक्स करण्यात आला.

मात्र, आणखी विसर्ग वाढविण्यासाठी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अलमट्टी धरणातून तत्काळ २ लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवावा. तसेच नदी पत्रातील अतिरिक्त पाणी साठ्यातून सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात, असे निवेदन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. तसेच सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली. त्यानुसार आता अलमट्टीचा विसर्ग हा ७५ हजारावरून १ लाख २५ हजार क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button