सांगली : अतिवृष्टीने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसी वाढ | पुढारी

सांगली : अतिवृष्टीने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसी वाढ

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यासह कृष्णाकाठी गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

पलूस तालुक्यातील आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ६ फुटांची वाढ झाली आहे. नागठाणे बंधारा येथे पाणीपातळी १४ फुटांवर पोहचली आहे. बंधारा वाहतूकीस खुला आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणाचा पाणीसाठा : ३७.३६ टीएमसी (३५.४९%) वर पोहोचला आहे.

काल सकाळपासून धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ६ टीएमसीची वाढ झाली आहे. धरणात एकूण आवक ७४, ५६९ क्यूसेक्स आहे. तर धरणाचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून गेल्या २४ तासातील पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे, कोयनानगर – २५३ मिलिमीटर, नवजा – २७२ मिलिमीटर, महाबळेश्वर – ३३१ मिलिमीटर.

हेही वाचा : 

Back to top button